व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, स्थायी समिती आणि अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवर अधिसभेतून निवड
मुंबई, दि. १५ डिसेंबरः महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूदींनुसार मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, स्थायी समिती आणि अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवरील निवडणूक/नामनिर्देशाचे निकाल आज पार पडलेल्या विशेष अधिसभेच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यानुसार व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य गटातून प्रा. दिलीप भारमल (खुला प्रवर्ग) आणि प्रा. दिलीप पाटील (इतर मागासवर्ग प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली. तर अध्यापक गटातून झालेल्या एकूण ६९ मतदानातून डॉ. अनुप पळसोकर ( खुला प्रवर्ग) हे ५१ मतांनी निवडून आले. तर डॉ. जगन्नाथ खेमनर (विमुक्त जाती प्रवर्ग) हे बिनविरोध निवडून आले. व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून सुनील जोशी ( खुला प्रवर्ग) बिनविरोध निवडून आले. नोंदणीकृत पदवीधर गटातून मिलिंद साटम (खुला प्रवर्ग) आणि शितल शेठ (अनुसूचित जाती प्रर्वग) यांची बिनविरोध निवड झाली.
विद्यापरिषदेवर व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून रविंद्र घोडविंदे यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती या प्राधिकरणावर प्राचार्य गटातून प्रा. वसंत माळी आणि नोंदणीकृत पदवीधर गटातून प्रदीप सावंत यांची बिनविरोध निवड झाली. तर अध्यापक गटातून स्थायी समितीवर डॉ. अनूप पळसोकर हे ४७ मतांनी निवडून आले. अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवर अध्यापक गटातून डॉ. विनोद कुमरे हे ४८ मतांनी निवडून आले तर अध्यापकेत्तर कर्मचारी गटातून संतोष निकम यांची बिनविरोध निवड झाली.
मुंबई विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर निवडून/नामनिर्देशाने आलेल्या सर्व मान्यवर सदस्यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्वागत करून अभिनंदन केले. या निवडणूकीच्या कामी उपकुलसचिव (निवडणूक) विकास डवरे, सहाय्यक कुलसचिव रमेश दामसे आणि त्यांच्या चमूने अथक प्रयत्न घेतले. आज पार पडलेल्या निवडणूकीसाठी डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे विशेष सहाय्य लाभले.