शिक्षण संचालकांची नव साक्षरता वर्गाला भेट

0
70

भंडारा,दि.20 : डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योज‌ना) पुणे यांनी  नुकतीच  जिल्हयास भेट दिली.त्यांनी जिल्हा परिषद भंडारा येथे रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रविंद्र सलामे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सभा कक्षात आढावा बैठक घेतली.

             यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.यात पी.पी.टी.द्वारे जिल्हा सादरीकरण शिक्षणाधिकारी (प्राथ.)यांनी केले. जिल्हास्तरावरील नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत वर्गभेटीचे नियोजन, असाक्षर नोंदणी, स्वयंसेवकाचे नवसाक्षर शिकवणीचे वर्ग, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी अपघात विमा योजना, ईबीसी सवलत योजना याबाबत शिक्षण संचालक(योजना) यांनी आढावा घेतला. सन 2024-25 चे नवसाक्षर  व स्वयंसेवक नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण  केल्याबद्दल शिक्षण संचालक यांच्या हस्ते लाखनी तालुका गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे व साकोली गटशिक्षणाधिकारी  विजय आद‌मने यांना  पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

             नवभारत साक्षरता कार्यक्रम 2024-25 अंतर्गत सुरु असलेले साक्षरता वर्ग, अधिकारी यांनी दिलेल्या भेटी, तसेच विद्यार्थी लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत शिक्षण संचालकांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी केले तर रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी शिक्षक संचालक याचे आभार  मानले.

          तद्‌नंतर नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुका साकोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी (सडक) येथील नवभारत साक्षरता वर्गाला शिक्षण संचालकांनी भेट दिली. यावेळी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद यांनी ढोल-ताशांच्या गजरात शिक्षण संचालक यांचे उत्साहात स्वागत केले. नवसाक्षरांचे वर्ग, उत्स्फूर्त  वाचन, संख्या ज्ञान, गीत गायन पाहून शिक्षण संचालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेत उपस्थित सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले.

            स्व. मार्तंडराव कापगते विद्यालय जांभळी (सडक ) येथे शिक्षण संचालकांनी धावती भेट दिली. विविध योजनांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर भेटीत शिक्षणाधिकारी (प्राथ.)व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी वर्ग निरीक्षण, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, शिष्यवृत्ती वर्ग, नवोदय वर्ग, ग्रंथालय कक्ष इत्यादी तपासून सूचना दिल्या. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.रवींद्र माडेमवार, हरिकिशन अंबादे यांची उपस्थित होती.

          शिक्षण संचालनालय (योजना) पुणे कार्यालयामार्फत श्रीमती लीना भागवत, सहायक योजना अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांना भेटी देवून आढावा घेतला. यात ग्रामविकास हायस्कूल कोंढी जवाहरनगर व सावरी शाळेला भेट देऊन अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, सारथी, NMMS शिष्यवृत्ती, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती बाबत आढावा घेतला. यासोबत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बेला येथील नवभारत साक्षरता वर्ग निरीक्षण  केले. नवसाक्षरांना शाल व पुष्पगुच्छ देणून गौरविण्यात आले. नवसाक्षरांचे वाचन, लेखन व संख्या ज्ञानाचा आढावा घेतला.

          त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दवडीपार (बाजार) येथील नवभारत साक्षरता वर्गांना भेटी देऊन स्वयंसेवक नवसाक्षर यांचे सोबत चर्चा केली. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रतिसाद बघून समाधान व्यक्त केले. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळेने केलेली सजावट, परिसर साफसफाई, परसबाग बघून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, स्वयंसेवक यांची विशेष उपस्थिती होती.