विद्यापीठात विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र कौशल्याचे धडे
-विद्यापीठात विद्यार्थ्यांकरीता सॉफ्ट स्किल कार्यशाळा
-नागपूर : मुलाखतीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल अर्थात कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन माननीय प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आयक्यूएसी सेल व रोजगार व प्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बार्क्ले यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय सॉफ्ट स्किल कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पदव्युत्तर गणित विभागातील रामानुजन सभागृहात या ३ दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. यावेळी डॉ. काकडे मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, रोजगार व प्रशिक्षण अधकारी डॉ. भूषण महाजन, बार्क्लेचे प्रशिक्षक श्री अजय द्विवेदी यांची उपस्थिती होती. शासकीय तसेच कार्पोरेट कंपन्यांमध्ये मुलाखतीला जाताना योग्य प्रकारे तयारी करून जावे लागते, असे पुढे बोलताना डॉ. काकडे यांनी सांगितले. मुलाखत घेताना विद्यार्थ्यांमधील कौशल्याची चाचपणी कंपन्यांकडून केली जाते. तुमच्यामध्ये कौशल्य असेल तर कंपन्या नोकऱ्या देतात. विद्यार्थ्यांना देखील सर्व कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. शैक्षणिक परिसरातील विद्यार्थी मुलाखतीच्या दृष्टीने तयार व्हावेत म्हणून या सॉफ्ट स्किल कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. काकडे यांनी दिली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांनी मनोगत व्यक्त करताना कौशल्य महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील अभ्यासक्रमात अर्धा भाग कौशल्यावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन प्रकल्प देखील कामगिरीच्या आधारे दिल्या जात आहे. मुलाखतीला जाताना तुमच्याकडे कोणते तांत्रिक कौशल्य आहे, हे विचारले जाते. सर्व बाबी तपासल्या जातात. सर्व विषयाचे ज्ञान असले तरी तुमच्यामध्ये कौशल्य नसेल, प्रभावी व्यक्तिमत्व नसेल तर कंपनीकडून निवड केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सॉफ्ट स्किल कार्यशाळेच्या माध्यमातून मुलाखत कौशल्य विकसित करावे असे आवाहन त्यांनी केले.

आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य यांनी मनोगत व्यक्त करताना नोकरी करिता मुलाखतीला जात असताना पात्रता पदवी सोबतच अधिक कौशल्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेतील तीन दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमच्यामध्ये बदल झालेला दिसून येईल. कार्यशाळेत शंभर टक्के उपस्थिती दर्शवित कौशल्य ज्ञान प्राप्त करावे असे डॉ. आचार्य यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी मानले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मुलाखतीचे कौशल्य, दुसऱ्या दिवशी कार्पोरेट कंपन्यांमध्ये मुलाखतीला जाण्याची पूर्वतयारी तसेच तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीचे तंत्र तसेच समूह चर्चा आदी विविध कौशल्य विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे.
विद्याशाखा निहाय कार्यशाळा
विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरातील सर्व एमएसस्सी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २३ जानेवारी दरम्यान गणित विभागातील रामानुजन सभागृहात सॉफ्ट स्कील कार्यशाळा होत आहे. सर्व एमए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मानव विज्ञान इमारतीतील राज्यशास्त्र विभागाच्या सभागृहात सॉफ्ट स्किल कार्यशाळा शुक्रवार, दिनांक २४ ते २७ जानेवारी दरम्यान होणार आहे. एमबीए, एमकॉम आणि भूगर्भशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात २८ ते ३० जानेवारी दरम्यान सॉफ्ट स्किल कार्यशाळा होणार आहे.
