न्यायपूर्ण समाज निर्मितीसाठी संविधान महत्वपूर्ण- न्यायमूर्ती उज्जल भूयान यांचे प्रतिपादन

0
28
– ‘जस्टा काॅजा’ राष्ट्रीय महोत्सवात विशेष व्याख्यान
नागपूर : न्यायपूर्ण आणि समान समाज निर्मितीसाठी संविधान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री उज्जल भूयान यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित ‘जस्टा काॅजा’ राष्ट्रीय महोत्सवातील व्याख्यानमाला अंतर्गत अतिथी व्याख्यान शनिवार, दिनांक १८ जानेवारी  रोजी पार पडले. या व्याख्यानमालेत न्यायमूर्ती भूयान मार्गदर्शन करीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी भूषविले, तर प्रमुख व्याख्याते म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उज्जल भूयान, प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या वतीने शताब्दी महोत्सवी वर्षात आयोजित २२ व्या ‘जस्टा काॅजा’ या राष्ट्रीय विधी महोत्सवातील अतिथी व्याख्यानात न्यायमूर्ती श्री भूयान यांनी संविधानावर विचारमंथन केले. न्यायमूर्ती श्री भूयान यांनी भारतीय संविधानाच्या परिवर्तनशील शक्तीवर विचारमंथन करणारे भाषण देताना संविधानातील कलम १४ मधील समानतेच्या अधिकाराचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय समाजातील अस्पृश्यता, लिंगभेद आणि सामाजिक विषमतेसारख्या समस्यांवरही विचार व्यक्त केले. संविधानाच्या परिवर्तनशील भूमिकेवर भर देत त्याच्या मदतीने न्याय, समानता आणि बंधुत्वाचे संवर्धन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनावर आधारित संविधानाला एक सामाजिक बदल घडवून आणणारे ‘सर्वोच्च आणि परिवर्तनकारी स्वरूप” असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती भूयान यांनी समानता, न्याय, बंधुत्व आणि राखीव जागांद्वारे सकारात्मक कृतीच्या महत्त्वावर स्पष्टीकरण दिले. संविधानातील मूलभूत संरचना सिद्धांत, न्यायिक स्वायत्तता आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण आणि संतुलनांची भूमिका यावर विचारमंथन केले.
प्रमुख अतिथी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय  न्यायमूर्ती  नितीन सांबरे यांनी आपल्या विद्यार्थी जीवनाच्या आठवणी त्यांच्या भाषणात सांगितल्या. जागतिक स्पर्धेत टिकणाऱ्या शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत शिक्षकांच्या भूमिकेवर विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कायदेशीर क्षेत्रामध्ये जबाबदारीने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी न्यायमूर्तींचे स्वागत केले आणि या कार्यक्रमाचे आयोजन शंभराव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रेरणादायी प्रभाव पडेल, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी महाविद्यालयाच्या शंभराव्या वर्धापनदिनाचे महत्त्व सांगितले. ‘जस्टा काॅजा’ या कार्यक्रमाला महत्त्व देत विद्यार्थ्यांसाठी तो एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्सुकतेने अपेक्षित असलेला कार्यक्रम ठरल्याचे सांगितले. डॉ. मोर यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांना मानाचा मुजरा केला. यावेळी राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.समय बनसोड, सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर रोही, सेवानिवृत्त न्यायाधीश श्री गिलानी, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रवीणा खोब्रागडे, सहसमन्वयक डॉ.अधरा देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता डॉ. मृण्मयी कुकडे यांनी आभार व्यक्त करत झाली. शिक्षक समन्वयक म्हणून साक्षी कांचनवार यांची भूमिका होती, तर विद्यार्थ्यांचे सहसमन्वयक म्हणून तनय काळे यांचे योगदान लाभले.