जिल्ह्यातील विभागस्तरीय सर्वोच्च गुणांकन प्राप्त विद्यार्थी होणार सन्मानित…
गोंदिया,दि.15: 5 जानेवारी 2025 ला झालेल्या आय .एम .विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ ध्येयतरंग 0.3 पुणे येथे होणार आहे. या समारंभात गोंदिया जिल्ह्यातील विभागातरावर चमकलेले सर्वोच्च गुणांकन प्राप्त विद्यार्थी सन्मानित होणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा समन्वयक वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.
ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्राद्वारा संचलित आय .एम .विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. यावर्षी या परीक्षेत इयत्ता पहिली ते आठवीच्या 1,65,721 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्याचा निकाल 2 मार्च 2025 रोजी जाहीर झाला. 8 मार्च 2025 रोजी राज्यस्तरीय विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय मेरिट लिस्ट लागल्या. त्यामधील 7000 विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण सन्मान सोहळा व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा दिनांक 23 मार्च 2025 ला हडपसर पुणे येथील स्व. विठ्ठल तुपे नाट्यगृह, माळवाडी, येथे संपन्न होणार आहे. राज्यस्तरीय बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थी,त्यांचे आई -बाबा व शिक्षक यांना या बक्षीस समारंभास आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम व एकच ध्येय विद्यार्थी विकास हा मूलमंत्र लक्षात ठेवून विद्यार्थ्यांची प्रगती घडेल व राज्यात आपलेच विद्यार्थी अग्रेसर राहतील अशी माहिती ध्येय प्रकाशन अकॅडमी संस्थापिका सौ. अर्चना सुदाम शेंडगे यांनी दिली आहे.
आय. एम. विनर परीक्षेत चमकले गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी: गोंदिया जिल्ह्यातील 300 विद्यार्थ्यांनी आय.एम.विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा 2025 दिली होती. त्यामधील 16 विद्यार्थी विभाग स्तरावर तर 58 विद्यार्थी हे जिल्हास्तरावर चमकले आहेत. यापैकी विभागस्तरावरील सर्वोच्च गुणांकन प्राप्त विद्यार्थी यश वामन किरमोरे इयत्ता 8 वी (स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, आमगाव), धवल भाऊलाल चौधरी इयत्ता 2 री (शारदा कॉन्व्हेन्ट गोंदिया), उत्कर्ष महेश वलथरे इयत्ता 3 री (शारदा कॉन्व्हेन्ट गोंदिया) यांचा पालकांसह सन्मान राज्यस्तरीय कार्यक्रमात होणार आहे. तसेच इतर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा समन्वयक वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.