देवरी येथे ‘सक्षम बालिका,सक्षम भारत’ प्रकल्प

0
16

विद्यार्थिनींशी संवाद साधताना देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे

देवरी,ता17(berartimes.com)- स्थानिक ब्लासम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी काल ‘सक्षम बालिका, सक्षम भारत’ प्रकल्पांतर्गत देवरी पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिसांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
विद्यार्थिनींची शिक्षणातील प्रगती आणि समाजातील स्थान उंचावण्याच्या उद्देशाने ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये ‘सक्षम बालिका, सक्षम भारत’ प्रकल्पाची सुरवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत काल मंगळवारी शालेय विद्यार्थिनींनी देवरी पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. समाजाची सेवा करत असताना पोलिस अधिकारी व कर्मचारी हे चोविस तास कार्यात व्यस्त असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांना आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि पोलिसांमुळे गुन्हेगारीवर वचक ठेवला जात असल्याचे सांगत ठाणेदार राजेश तटकरे यांनी पोलिसांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. रक्षाबंधनाच्या पर्वावर ही भेट आयोजित केल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून ऋणानुबंध आणखी घट्ट केले. यावेळी पोलिस कर्मचारी-अधिकारी विद्यार्थिनींनी दाखविलेल्या स्नेहाने भारावून गेले. विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षिततेची हमी यावेळी देवरी पोलिसांनी दिली.
या भेटीला मूर्त रुप देण्यासाठी नितेश लाडे, हरिष उके,हर्षदा चारमोडे, सरिता थोटे आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले.