
७६ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले
एकूण २८ स्पर्धांमध्ये २५ पारितोषिकांचा बहुमान
मुंबई, दि.१४ फेब्रुवारी : ३९ व्या दक्षिण- पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी करत स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. एकूण पाच विभागीय स्पर्धांमध्ये ७६ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले आहे. संगीत, नाट्य आणि नृत्य विभागातील स्पर्धांवर विजयी मोहोर उमटवत या तीन्ही स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपदही प्राप्त केले आहे. जे.एस.एस. एकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, म्हैसूर, कर्नाटक येथे ९ ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या युवा महोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील ३५ विद्यापीठे सहभागी झाली होती.
मुंबई विद्यापीठाने संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला या पाच विभागातील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत विद्यापीठाने ७६ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. या पाच विभागातील २८ स्पर्धांसाठी विद्यापीठातील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकांकिका, प्रहसन, वादविवाद (इंग्रजी) आणि चिकट चित्रकला या स्पर्धांमध्ये ४ सुवर्ण पदकांचा बहुमान विद्यापीठास प्राप्त झाला. तर पाश्चिमात्य वाद्यवादन, भारतीय समूहगान, भारतीय लोक नृत्य, सर्जनशील नृत्य आणि मुकनाट्य या ५ स्पर्धांमध्ये विद्यापीठास रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले. लोकवाद्यवृंद, पाश्चिमात्य समुह गायन, वक्तृत्व (इंग्रजी), माती शिल्प काम आणि रांगोळी या ५ स्पर्धांमध्ये विद्यापीठाने कांस्य पदकांची कमाई करत या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे पाचही स्पर्धा गटातील विविध स्पर्धांमध्ये ११ उत्तेजनार्थ पारितोषिके मुंबई विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. अशा एकूण २८ स्पर्धांपैकी २५ पारितोषिकांचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. तसेच वैष्णव पाटील आणि अंशिका पंगोत्रा यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या परितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावरील विजेते व माजी विद्यार्थी अमोल बावकर, अभिजीत मोहिते, रोहन कोटेकर, महेश कापरेकर, सागर चव्हाण, अमित घरत, आशिष पवार, महेश देशमुख, विवेक वारभुवन, विलास रहाटे, केशर चोपडेकर, रामनाथ कातोरे आणि समर्थ गवंडी या सर्वांचे सहकार्य लाभले असून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी यशस्वीरित्या या स्पर्धेचे नियोजन केले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी विजयी चमूचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





