गडचांदूर : महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमात कार्यरत शिक्षक निदेशक, लिपीक, शिपाई यांना शासनातर्फे सुधारीत वेतनश्रेणीनुसार वेतन दिल्या जात आहे. मात्र या अभ्यासक्रमाअतंर्गत भाषा विषय (मराठी, इंग्रजी) तसेच पायाभूत अभ्यासक्रम शिकविणार्या घड्याळी तासावरील शिक्षकांना केवळ ४८ रुपये तासिकाप्रमाणे वेतन दिले जात आहे.
या शिक्षकांना संपूर्ण वर्षाचे केवळ ११ ते १२ हजार रुपये मिळतात. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर शिक्षकांनी कसे कार्य करावे त्यांचे कुटुंब कसे चालणार? याची विचार अद्यापपावेतो शासनाने केला नाही.
घड्याळी तासावर कार्यरत शिक्षकांचे मानधन वाढवावे व त्यांचे वेतन त्वरीत द्यावे अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. मात्र शासनाडून दुर्लक्ष होत आहे.
या शिक्षकांना महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनावर जीवनचरितार्थ कसा चालवावा हा भीषण प्रश्न त्यांच्या समोर आहे
आज मजुरांना सुद्धा यापेक्षा जास्त वेतन मिळते ही शोकांतिका आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या या शिक्षकांची शासनाकडून अवहेलना होत आहे. शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तुटपुंज्या वेतनावर कार्यरत शिक्षकांचे मानधन वाढवावे, अशी शिक्षकांची मागणी आहे. या शिक्षकांना मानधनसुध्दा नियमित मिळत नाही. त्यामुळे आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.