आश्रमशाळांचे वेतन १ तारखेलाच

0
7

नागपूर -राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच होईल. तशी रचना कार्यान्वित झाली आहे’, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. यासंबंधी रामनाथ मोते यांनी प्रश्न विचारला होता.

सावरा म्हणाले, ‘आश्रमशाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाइन करण्यासाठी वेगळी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याद्वारे जुलैपासूनचे वेतन मोकळे करण्यात आले आहे. तसेच नोव्हेंबरचे वेतनदेखील देण्यात आले आहे. यापुढे आता सर्व महिन्यांचे वेतन १ तारखेलाच होईल.’

मात्र, अनेक आश्रमशाळांच्या भागात इंटरनेट सुविधा नसते. तेथे वेतन ऑनलाइन कसे देणार, असा उपप्रशंन श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील आणि विक्रम काळे या शिक्षक आमदारांनी उपस्थित केला. ‘अशा शाळांमध्ये प्रसंगी ऑनलाइन अथवा जुन्या पद्धतीनेच वेतन दिले जाईल. पण १ तारखेलाच या शिक्षकांचे वेतन मोकळे करण्यावर सरकार कटिबद्ध आहे’, असे विष्णू सावरा म्हणाले.

सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे भरणार!

‘सामाजिक न्याय विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरली जातील’, असे आश्वासन सामाजिक न्याय रा‌ज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. यासंबंधी विजय गिरकर यांनी प्रश्न विचारला होता. कांबळे म्हणाले, ‘राज्यात सर्वत्र अशी पदे रिक्त असल्याची माहिती सरकारला आहे. तसेच जातपडताळणी कार्यालयातदेखील पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण आहे. पण यासंबंधीची ऑर्डर तात्‍काळ काढली जाईल.’