गोंदिया : शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेची भीती दूर व्हावी आणि भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तसेच शालेय अभ्यासक्रम किती आत्मसात झाला व शालेय अंतिम परीक्षेत अपेक्षित यश मिळावे या उद्देशाने ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय ‘आय एम विनर’ व ‘विनर ऑफ द इयर’ या दोन स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही स्पर्धा परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. बक्षीस वितरण २९ मार्च रोजी निगडी (पुणे) येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात येथे होणार असल्याची माहिती ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे गोंदिया जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे.
‘आय एम विनर’ ही परीक्षा मराठी गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या चार विषयांवर इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. जी शासनाच्या शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेवर आधारित असते. ज्यामधून मुलांच्या स्पर्धात्मक बुद्धीला चालना मिळून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला तयार होतो. ही परीक्षा राज्यात एकाच वेळी ५ जानेवारी रोजी झाली होती. तर ‘विनर ऑफ द इयर’ ही परीक्षा १ मार्च रोजी घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांमध्ये जिल्ह्यातील एकूण एक हजार ८०० विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. या परीक्षांचे नुकतेच निकाल जाहीर होऊन गुणवत्ता यादी प्रकाशित झाली. यामध्ये राज्यस्तर गुणवत्ता यादीत ‘आय एम विनर’ परीक्षेत दोन तर ‘विनर ऑफ द इयर’ परीक्षेत तीन विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार पुणे येथे होणार आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे यांनी केले आहे.
हे आहेत राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
आय एम विनर परीक्षा: निराली मनीष चापले, इयत्ता पाचवी, पीएमश्री राणी अवंतीबाई नगर परिषद प्राथमिक शाळा लोधीटोला तिरोडा (राज्य रैंक ४), श्रावणी संजय टेंभरे, इयत्ता दहावी, शारदा कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल, गणेशनगर, गोंदिया (राज्य रैंक २)
विनर ऑफ द इयर परीक्षा : पूर्वार्ध वशिष्ठ खोब्रागडे, इयत्ता सातवी, इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथमिक शाळा कुडवा, गोंदिया (राज्य रैंक ३), लक्ष हुमेंद्र खोटेले, इयत्ता सातवी, इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथमिक शाळा कुडवा, गोंदिया (राज्य रैंक ३), निराली मनीष चापले, इयत्ता पाचवी, पीएमश्री राणी अवंतीबाई नगर परिषद प्राथमिक शाळा लोधीटोला तिरोडा (राज्य रैंक १)




