राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची मागणी : प्रफुल्ल पटेल यांना दिले निवेदन
सालेकसा : राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा गोंदिया जिल्ह्याचे विकास पुरुष खा. प्रफुल पटेल यांना तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिकांच्या वतीने सालेकसा तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि. २०) देण्यात आले.
अनेक वर्षापासून रखडलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या पुढाकाराने लवकरात लवकर सालेकसा तालुक्यात स्थापन करण्यात यावी. याचा थेट लाभ सर्व शेतकरी, मजूर, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार यांना होणार. शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे योग्य दर मिळणार. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना केल्याने तालुक्यातील इतर ठिकाणी जाणारे मजुरांचे स्थलांतर होणार नाही आणि त्यांना याच तालुक्यात रोजगाराची संधी उपलब्ध होणार. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अजय उमाटे, शहराध्यक्ष ब्रजभूषण बैस, जिल्हा महासचिव डॉ. हिरालाल साठवणे, तालुका युवक अध्यक्ष बाजीराव तरोने, किसान आघाडीचे किसन रहांगडाले उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपण या विषयावर राज्य शासनाचे संबंधित विभागाला योग्य व ठोस पाठपुरावा करणार, अशी ग्वाही दिली.





