25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक रखरखत्या उन्हात नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा

रखरखत्या उन्हात नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा

0
55

सालेकसा : सध्या ‘नवतपा’ सुरू असल्याने सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. जिल्हयातील तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पार गेला असतानाच, दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. या भीषण उकाड्यात आणि रखरखत्या उन्हात परीक्षा केंद्रे गाठताना विद्यार्थ्यांच्या जीवाची अक्षरशः लाही लाही होत आहे. यामुळे आरोग्याचा मोठा धोका लक्षात घेता या परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होऊ लागली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत बी. एस्सी. (उन्हाळी २०२६) च्या सहाय्या सत्राच्या परीक्षा २६ मे पासून सुरू झाल्या असून त्या २३ जूनपर्यंत चालणार आहेत. विशेष म्हणजे, या परीक्षेची वेळ भर दुपारी २.३० ते ५.३० अशी ठेवण्यात आली आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांना दुपारी २.०० वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागते. नेमक्या याच वेळी उन्हाचा तडाखा आणि उभेडा सर्वाधिक असतो. ग्रामीण व निमशहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी सायकलने किंवा दुचाकीने प्रवास करावा लागतो. ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानात भर दुपारी अशा प्रवास केल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. उपतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासन नागरिकांना दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे विद्यापीठ मात्र ऐन उन्हाळ्यात दुपारी परीक्षा घेत आहे. हा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ असल्याचा संतत आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि बदलत्या हवामानाची गंभीर दखल घेत, विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलाव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.

blank