24.7 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home शैक्षणिक सी.एम.एस. महाविद्यालयात विदर्भातील प्रथम ४५० क्षमतेची संगणक लॅब

सी.एम.एस. महाविद्यालयात विदर्भातील प्रथम ४५० क्षमतेची संगणक लॅब

0
2
-‘स्व. डॉ. मालतीताई उमाठे कॉम्प्युटर सेंटर’चा शुभारंभ सोहळा
नागपूर :ओंकार नगर येथील सी. एम. एस. महाविद्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा विदर्भातील पहिल्या सलग ४५० संगणक क्षमतेच्या ‘लेट डॉ. मालतीताई उमाठे कॉम्प्युटर सेंटर’चा भव्य लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सेंटरमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे डिजिटल व संगणकीय शिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साईबाबा लोकसेवा शिक्षण संस्था व सती माता शिक्षण संस्थेचे सचिव किशोर उमाठे उपस्थित होते. तसेच सती माता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मंदाताई उमाठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, साईबाबा लोकसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. ओमकार उमाठे, सीएमएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. भौमिक तसेच उमाठे कॉलेजचे प्राचार्य डॉ. नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर म्हणाल्या की, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची जोड मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयात एकाच वेळी ४५० संगणक क्षमतेची ही अद्ययावत लॅब विदर्भातील विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांमध्ये पारंगत करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.”
कुलसचिव डॉ. विजय खंडाळ यांनी आपल्या भाषणात, “विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची अत्याधुनिक व अवाढव्य पायाभूत सुविधा उभी राहणे ही अभिमानास्पद बाब आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आणि तांत्रिक क्षमतेला नवी दिशा मिळेल,” असे नमूद केले.
तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “बदलत्या शैक्षणिक धोरणात संगणकीय व तांत्रिक साक्षरता अनिवार्य झाली आहे. एकाच छताखाली ४५० संगणकांची उपलब्धता विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या व उच्च शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करेल.” असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सचिव किशोर उमाठे यांनी, “विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि तंत्रस्नेही शिक्षण उपलब्ध करून देणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय असून, या लॅबच्या माध्यमातून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणारी सक्षम पिढी घडेल,” असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी आधुनिक संगणक लॅबची पाहणी केली आणि संस्थेच्या या दूरदृष्टीचे कौतुक केले. या सोहळ्याला संपूर्ण उमाठे परिवारातील सदस्य व संस्थेचे पदाधिकारी तुकाराम कोचे. सौ. भाग्यश्री तेलरांधे, सौ. सुनीता दुधे, डॉ प्रीती उमाटे व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.