30.7 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home Featured News शासकीय नोकरी सांभाळून वृक्षारोपणाचा छंद जोपासणारे अमित शहारे

शासकीय नोकरी सांभाळून वृक्षारोपणाचा छंद जोपासणारे अमित शहारे

0
3

५० विविध फळझाडांची लागवड; सुट्टीच्या दिवशी जंगल परिसरात वृक्षसंवर्धनाचा उपक्रम
अर्जुनी-मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे)
मनात दृढसंकल्प आणि पर्यावरण संवर्धनाची तळमळ असेल, तर शासकीय जबाबदाऱ्यांसोबतही निसर्गसेवेचे कार्य प्रभावीपणे करता येते, हे अर्जुनी-मोर येथील अमित शहारे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शासकीय नोकरीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा छंद जोपासला असून, विशेषतः जंगल परिसरात फळझाडे लावण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
अमित शहारे हे काही महिन्यांपूर्वी अर्जुनी-मोर येथील महावितरणमध्ये उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची पदोन्नती होऊन ते गडचिरोली येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भरारी पथक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत व्यस्त असतानाही त्यांनी पर्यावरण संवर्धनाची आपली आवड कायम ठेवली आहे.
शहारे हे वर्षभर विविध फळांचे बीज संकलित करतात. त्यापासून आपल्या घरीच रोपटी तयार करून पावसाळ्यात तालुक्यातील जंगल परिसरात त्यांची लागवड करतात. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी वेळ काढून ते स्वतः वृक्षारोपणासाठी जंगल परिसरात जातात. त्यामुळे वृक्षलागवड हा केवळ छंद न राहता त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ६ सप्टेंबर रोजी अरततोंडी बसस्थानक परिसरातील जंगलात सुमारे ५० विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये हापूस, केशर, आम्रपाली या आंब्यांच्या जातींसह जांभूळ व इतर विविध फळझाडांच्या रोपट्यांचा समावेश होता. जंगल परिसरात फळझाडांची लागवड केल्यामुळे भविष्यात वन्यजीवांना नैसर्गिक अन्नाचा स्रोत उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.
या वृक्षारोपण उपक्रमात अमित शहारे यांच्यासह प्रशांत लाडे, प्रदीप खोब्रागडे, जितू नाकाडे, कु. अर्मिती शहारे, अद्विक शहारे, कु. अधिशा लाडे, कु. नायरा मेश्राम, प्रेशीत सांगोळे, कु. श्रावण्या सांगोळे आदींनी सहभाग घेतला.
‘झाडे लावणे’ एवढ्यावर न थांबता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची गरज आहे. शासकीय सेवेत कार्यरत असतानाही वेळ काढून निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या अमित शहारे यांचा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या प्रयत्नातून वृक्षलागवडीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजण्यास मदत होत आहे.