गोरेगाव:तालुक्यातील मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत, नुकत्याच ‘पवित्र पोर्टल’द्वारे जिल्ह्याला मिळालेल्या ४५० शिक्षकांमधून मुंडीपार क्षेत्रातील शाळांमध्ये प्राधान्याने नियुक्ती करावी, अशी आक्रमक मागणी जिल्हा परिषद सदस्य सशेंद्र भगत यांनी केली आहे.
तालुक्यातील विविध केंद्रांमध्ये शिक्षकांची पदसंख्या अपुरी असल्याने शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामध्ये मुंडीपार केंद्रांतर्गत १५, तिल्ली मोहगाव केंद्रांतर्गत १६, कुहाडी केंद्रात १३, दवडीपार केंद्रात ८ तर चोपा केंद्रात तब्बल १८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले असून पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या बिकट परिस्थितीची गंभीर दखल घेत जि.प. सदस्य सशेंद्र भगत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना थेट निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नवीन शिक्षक भरतीमुळे या भागातील शाळांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या मागणीवर किती तातडीने कारवाई करून ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करते, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.
“शिक्षकांअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ४५० नवीन शिक्षक जिल्ह्याला मिळाले असल्याने, गोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक फटका बसलेल्या मुंडीपार आणि लगतच्या केंद्रांमध्ये या शिक्षकांची तात्काळ पदस्थापना करण्यात यावी.” — सशेंद्र भगत, जि.प. सदस्य





