एस.एस. जायस्वाल महाविद्यालयात सूक्ष्मजीवांबद्दल जनजागृती कार्यक्रम
अर्जुनी मोरगाव – “ आपल्या अवतीभवती असणारे अनेक लहान मोठे सूक्ष्मजीव हे आपल्याकरिता उपयोगी असतात. जवळपास ९० टक्के सूक्ष्मजीव मानवी जीवनाकरिता फायदेशीर असतात आणि फक्त १० टक्के हे आजार पसरवणारे असतात. भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात अँटिबायोटिक चा वापर चुकीच्या पद्धतीमुळे वापरण्यात येत असून सूक्ष्मजीव हे प्रतिजैविकाना प्रतिरोध करण्याची क्षमता वाढवत आहेत. येत्या काळात कोणतेही प्रतिजैविक सूक्ष्मजीवांवर परिणाम करू शकणार नाहीत” असे मत म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सदस्य डॉ. प्रकाश हलामी यांनी व्यक्त केले. ते स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, आणि मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थांना सूक्ष्मजीवांबद्दल माहिती व जनजागृती “मायक्रोब आर्ट”निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या वेळी बोलत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य डॉ. भारत राठोड, प्रमुख अतिथी श्री. दुर्गा शिक्षण संस्थेचे सहसचिव मयंक जायस्वाल, IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कापगते आणि कार्यक्रमाचे समन्वयक डॉ अमोल श्यामकुवर, हे उपस्थित होते..
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. भारत राठोड यांनी आपल्या जीवनातील सूक्ष्मजीवाना समजून घेण्याकरिता सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय अतिशय महत्वाचा असल्याचे सांगून अर्जुनी मोरगाव परिसरातील आलेल्या विविध विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील चमूचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले .
या प्रसंगी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, अर्जुनी/मोर येथील प्रा. ओंकार लांजेवार, प्रा. फिरोज शेंडे, प्रा. ज्योत्स्ना शेळके, श्रीमती उमाबाई संग्रामे कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव बांध येथील भीमराव लाडे, जय दुर्गा कनिष्ठ महाविद्यालय, गौरनगर येथील प्रा. प्रफुल गोलेलवार, न्यू मून कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथील प्रा. शीतल मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.संचालन उत्कर्षा कांबळे व ऋतुजा खोब्रागडे यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार डॉ. अमोल श्यामकुवर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. भाग्यश्री लांजेवार, प्रा. विवेक कठाने, प्रा. यात्रिक भगत, प्रा. मोहन धुरटकर, प्रा. कैलास लोखंडे यांनी परिश्रम घेतले.





