नागपूर-पुढीलवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात ‘अविष्कार-२०१५’ होऊ घातले असून त्याचे यजमानपद पशु व मत्स्य विद्यापीठाने स्वीकारले आहे. महाराष्ट्र राज्य नववा आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव ‘अविष्कार-२०१५’, महाविद्यालय, जिल्हानिहाय आणि आंतरविद्यापीठ अशा तीन स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यवस्थापनविषयक कौशल्य विकसित व्हावे म्हणून दरवर्षी ‘अविष्कार’चे आयोजन करण्यात येते. पहिल्यांदा महाविद्यालयीन स्तरावर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यातून उत्कृष्ट ठरलेल्या प्रतिकृतींना जिल्हास्तरावर आणि त्यानंतर आंतरविद्यापीठस्तरावर सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रदर्शनातील प्रतिकृतींची पाहणी विद्यापीठाने निवड केलेली चमू करेल. त्यानंतर जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी महाविद्यालये निश्चित करण्यात आली आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ातून येणाऱ्या प्रतिकृतींसाठी चंद्रपूरचे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय निश्चित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सहा व सात जानेवारीला प्रदर्शन होईल. नागपूर आणि वध्र्यासाठी सक्करदऱ्याचे मोहता विज्ञान महाविद्यालय निश्चित करण्यात आले असून आठ आणि नऊ जानेवारीला त्या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात येईल. भंडारा व गोंदियासाठी १० व ११ जानेवारी निश्चित करण्यात आली असून गोंदियाच्या धोटेबंधू विज्ञान महाविद्यालयात प्रदर्शन भरवण्यात येईल.
दुसऱ्या स्तरातून निवडण्यात येणाऱ्या प्रतिकृतींचे संशोधन पेपर आणि सीडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याणचे संचालकांकडे सुपूर्द करेल. २१ ते २३ जानेवारीदरम्यान महाराष्ट्र पशू, मत्स्य विद्यापीठात तिसऱ्या स्तरावरावर प्रदर्शन होईल, अशी माहिती नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. धनंजय वेळुकर यांनी दिली