‘खूब लड़ी मर्दानी’राणी !

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमोल परचुरे,समीक्षक

सध्या मुंबई पोलीस, त्यांची कार्यपद्धती, तपास करताना येणार्‍या अडचणी, पोलिसांचं कौटुंबिक जीवन या सर्व गोष्टी दाखवणारे सिनेमे एकापाठोपाठ येत आहेत. यातले काही सिनेमे सिंघमसारखे फिल्मी असतात तर काही रेगेसारखे वास्तववादी…आता या आठवड्यात आलाय ‘मर्दानी’…’मर्दानी’मध्ये अगदी चवीपुरता फिल्मीपणा आहे पण बाकी सिनेमा अगदी खर्‍या वातावरणातला..राणी मुखर्जी असूनही सिनेमात ग्लॅमर नाहीये, हिरो नाही आणि गाणी वगैरेसुद्धा नाही.
केवळ कथेवर लक्ष ठेवून या कथेत प्रेक्षकांना कसं गुंतवून ठेवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न प्रदीप सरकार यांनी केलेला आहे. सिनेमाचा विषयही खूप गंभीर आहे, एक असं जग, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसेल अशा जगात हा मर्दानी सिनेमा आपल्याला घेऊन जातो. कोवळ्या वयातील मुलींना फसवून त्यांच्या शरीराचा व्यापार करायचा हा धंदा या सिनेमात दिसतो. टेकनसारख्या हॉलिवूड सिनेमात ही अशी उलट्या काळजाची माफियागिरी आपण बघितलेली असली तरी देशातल्या मोठमोठ्या महानगरात हा प्रकार कसा बिनबोभाट सुरू आहे याचं अंगावर काटा आणणारं चित्रण मर्दानीमध्ये दिसतं. या वेगळ्या विषयासाठी, सुंदर मांडणीसाठी आणि नैसर्गिक अभिनयासाठी हा मर्दानी बघायलाच पाहिजे, हे आधीच सांगतो.
राणी मुखर्जीने या सिनेमात शिवानी शिवाजी रॉय या क्राईम ब्रँच ऑफिसरची भूमिका केलीये. ही ऑफिसर रफ अँड टफ आहे, कुणालाही घाबरणारी नाही, कायद्याच्या कक्षेत राहून गुन्हेगारांना कसा धडा शिकवायचा हे ती पुरेपूर ओळखून आहे. अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना तिला सेक्स ट्रॅफिकींगचा सुगावा लागतो.

ही केस साधी नाही, यामागे संघटितपणे काम करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे हे तिच्या लक्षात येतं आणि मग ती या टोळीचा खात्मा करण्याचा चंग बांधते. यामध्ये गुन्हेगारी संपवणं हा एक हेतू असतोच पण लहान लहान मुलींना जाळ्यात ओढून ज्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं. त्यामधून त्यांची सुटकाही करायची असते.

या मिशनमध्ये अथार्तच तिलाही काही कौटुंबिक संकटांना तोंड द्यावं लागतं, पण या सगळी आव्हानं पार करुन ती मास्टरमाईंडपर्यंत कशी पोचते हे सिनेमात खूपच प्रभावीपणे दाखवलेलं आहे. क्लायमॅक्सला थोडा मेलोड्रामा आहे, पण त्याची बॉलिवूड प्रेक्षकांना आता सवय झालेली आहे. सिंघमसारख्या सिनेमात जो फिल्मीपणा असतो त्यापेक्षा मर्दानीमधली क्लायमॅक्सची मेलोड्रॅमॅटिक ऍक्शन नक्कीच सुसह्य आहे.

नवीन काय ?

मर्दानी सिनेमातला विषय बॉलिवूडसाठी नक्कीच नवा आहे. सेक्स ट्रॅफिकिंगचं जाळं पूर्णपणे लक्षात यावं यासाठी कथेमध्ये पुरेसा वेळ दिलेला आहे. शिवानी रॉय ही प्रामाणिक आणि रफटफ ऑफिसर आहे हे अगदी थोडक्या वेळात, दोन तीन प्रसंगात ठसवण्यात आलंय आणि त्यानंतर लगेचच मुख्य कथेला सुरुवात करण्यात आली आहे. मेन ट्रॅक सुरू झाला की, कथेचा ट्रॅक कुठेही बिघडत नाही.
अनावश्यक प्रसंग, अनावश्यक संवाद असं काहीच नसल्यामुळे आपलंही लक्ष सिनेमातच राहतं. खलनायकाची भूमिका करणारा कलाकार नवीन जरी असला तरी त्याच्याबद्दल प्रेक्षकांना चीड वाटणं, त्याचं वाईट व्हावं अशी इच्छा मनात येणं हे बंदिस्त पटकथेमुळे शक्य झालंय. सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगचाही विशेष उल्लेख करावा लागेल. कथा प्रवाही वाटते, दिसते ती लेखनामुळे आणि या तांत्रिक गोष्टींमुळेसुद्धा…मुंबई आणि दिल्लीच्या रस्त्यांवर चित्रित झालेले प्रसंग असतील किंवा खलनायकाच्या अड्‌ड्यावर चाललेले भयंकर प्रकार असतील, कॅमेराने आपलं काम चोख केलंय. एडिटिंगसुद्धा खूपच स्मूथ झालंय. एक अतिशय चांगला, सशक्त आशय असलेला सिनेमा बघितल्याचं समाधान हा मर्दानी नक्कीच देतो.
छोट्यातल्या छोट्या कलाकाराने केलेल्या अतिशय नैसर्गिक अभिनयाचं विशेष कौतुक करायला पाहिजे. खरंतर राणी मुखर्जी वगळता सिनेमात सगळेच तसे नवीन चेहरे आहेत, पण या सर्व कलाकारांनी आपली निवड अगदी सार्थ ठरवलेली आहे, खलनायक ताहिर भसिन हा अगदीच नवखा आहे, राणी मुखर्जी तर त्याला सिनेमात सतत ज्युनिअर म्हणत हिणवत असते.

पण अभिनयात या माहिर भसिनने सिनीअर्सच्या तोडीचं काम केलंय. आणि अर्थातच सिनेमा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेललेला आहे राणी मुखर्जीने… घरचाच सिनेमा असला तरी भूमिकेला पुरेपूर न्याय द्यायला लागतो, जे काम राणीने अगदी मनापासून केलंय. जबरदस्त रोलमध्ये तिने स्वत:ला अक्षरश: झोकून दिलंय. तिच्या अदाकारीसाठी, प्रदीप सरकार यांच्या जमून आलेल्या दिग्दर्शनासाठी आणि अतिशय गंभीर समस्येबद्दल जाणून घेण्यासाठी जरुर बघा मर्दानी..(साभार आय़बीएनलोकमत)