आयटीआयचे ५५ हजार विद्यार्थी अखेर उत्तीर्ण

0
17

नागपूर- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत (आयटीआय) परीक्षेत लागू केलेल्या ‘मायनस गुणदान पद्धती’मुळे राज्यातील ५५ हजार विद्यार्थी नापास झाले होते. त्यामुळे संचालनालयाने ही गुणदान पद्धतच रद्द करून, या सर्व विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. या निकालात नापास ठरलेले हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘मायनस गुणदान पद्धती’मुळे गेल्या महिन्यापासून संचालनालय वादाच्या भोव-यात सापडले होते. याविरोधात अनेक विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटनांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही याविषयी चर्चा झाल्याने संचालनालयाने ही पद्धत रद्द करून नापास विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयटीआय’त ‘एनआयएमआय’ ही परीक्षा पद्धत राबवण्यात येत होती.
त्यानुसार दोन वर्षात एक फायनल परीक्षा घेण्यात येत असे. या पद्धतीत बदल करून २०१३-१४ पासून चुकीचे उत्तर लिहिल्यास मायनस गुणदान पद्धत राबवण्यास सुरुवात झाली, परंतु या परीक्षा पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात न आल्याने हजारो विद्यार्थी आयटीआयच्या परीक्षेत नापास झाले होते. मायनस गुणदान पद्धतीमुळे राज्याचा निकाल ५१ टक्के लागला होता. सुधारित निकालामुळे राज्याचा निकाल ७४ टक्के लागला आहे.
इंजीनिअरिंग ट्रेड असलेल्या विद्यार्थ्यांना ७ आणि नॉन इंजीनिअरिंग ट्रेड असलेल्या विद्यार्थ्यांना दोन गुण वाढीव देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्याच्या व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआयच्या प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याची मागणी २००९ पासून करण्यात येत आहे. ही मागणी डीजीईटीने मान्य केली असून, सर्व आयटीआयच्या शाखांत येत्या शैक्षणिक परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत