भूतबाधा टाळण्यासाठी शाळेला ‘लिंबू-मिरची’!

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

एटापल्ली-विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शाळांमधून विज्ञानाधारित शिक्षण देणे अपेक्षित असताना गडचिरोली जिल्ह्यातील एका शाळेने अंधश्रद्धेचा धडा गिरवला. विद्यार्थ्यांना भूतबाधा होऊ नये म्हणून शाळेला चक्क भारलेली लिंबू-मिरची बांधण्यात आली! एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही विनोबा भावे आश्रमशाळेत हा प्रकार घडला़

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घृणास्पद प्रकाराबाबत वृत्त प्रकाशित होऊनही अद्याप शाळेत भारलेल्या लिंबू, मिरच्या पडलेल्या आहेत. या प्रकाराचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

घडलेली हकीकत अशी-दुर्गम भागात असलेल्या पंदेवाही आश्रमशाळेतील सहावीची विद्यार्थिनी सुनीता कुल्ले ओकसा हिचा १ डिसेंबर रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना विविध आजारांनी ग्रासले. या आजारी विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्याऐवजी शाळेच्या शिक्षकांनी वेगळीच ‘मात्रा’ लागू केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे इतर विद्यार्थ्यांना भूतबाधा झाल्याचा संशय व्यक्त करीत गावातील काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांसह शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत आश्रमशाळेत पूजाविधी केला. भारलेले लिंबू-मिरची संपूर्ण वर्ग खोल्या व निवासी खोल्यांना बांधण्यात आले!

आश्रमशाळेत घडलेल्या अंधश्रद्धेच्या या प्रात्यक्षिकाबाबत मुख्याध्यापकाकडे विचारणा केली असता, ग्रामस्थांच्या दबावापोटी आपण पूजापाठ केल्याचे कबुल केले. तर या घटनेची माहिती मिळताच भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आदिवासी विकास निरीक्षक डॉ. ललित कायरकर यांनी शाळेला भेट देऊन गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. परंपरेनुसार आपण शाळेत लिंबू, मिरच्या बांधल्या, असे पालकांनी जबाबात नमूद केले.