घोटाळेबाज महाविद्यालय सील

0
27

गडचिरोली : एमएसबीटी अंतर्गत तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम चालविणार्‍या गडचिरोली जिल्ह्यातील तीन संस्थाचालकांनी शासनाची बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यावधी रूपयाची शिष्यवृत्ती लाटली. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या विशेष तपास अधिकार्‍यांनी संबंधीत संस्थांतर्गत असलेल्या महाविद्यालयांची झडती घेऊन तेथील कागदपत्र जप्त केले व या महाविद्यालयांना आता सील ठोकण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था सावलीचे रोहित बोम्मावार, संकल्पसिध्दी बहुउद्देशिय विकास संस्थेचे अध्यक्ष अमित बंदे तसेच कै. राहूलभाऊ बोम्मावार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँन्ड टेक्नालॉजी चामोर्शीचे सुरज बोम्मावार यांच्या मागावर पोलीस पथक फिरत आहे. हे तिनही संस्थाचालक अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून यांच्या घरीही पोलिसांचे पथक जाऊन त्यांच्याकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. गडचिरोली शहरात मोटवानी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शिवनेरी कॉलेजमध्येच बोम्मावारांच्या महाविद्यालयाचा संसार सुरू होता, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. बोम्मावार यांनी शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार केल्यानंतर आता नव्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी आरमोरी येथे पेट्रोल पंपाकरीताही अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, अशी माहितीही पुढे आली आहे. बोम्मावारांनी आणखी काही बनावट नावावर संस्था स्थापन करून त्या माध्यमातूनही शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पूर्व विदर्भात गोंदिया येथेही कॉलेज नसताना शिष्यवृत्ती उचलण्याचा प्रयत्न या संस्थेने केला, अशीही माहिती तपासत पुढे आली आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे व चामोर्शीचे मनोज नवसारे यांनी महाविद्यालयावर धाडी घालून तेथील कागदपत्र जप्त करण्याची कारवाई केली.