शिक्षकाच्या मागणीला घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने ठोकले शाळेला कुलूप

0
9

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मिळाले शाळेला 4 शिक्षक

गोंदिया,दि.11-जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या तिरोडा तालुक्यातील परसरवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पुर्तता करण्याच्या मागणीला घेऊन आज मंगळवारला शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी कुलूप ठोकून आंदोलन केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र टेकाम,उपाध्यक्ष बाळुभाऊ सोनवाने,किशोर काळे,मनीराम हिंगे,रवि मेश्राम,भोजराम ढबाले,सरपंच सुलक्ष्मी श्यामकुवर,माया हिंगे,शोभा टेंभुर्णिकर,सुभाष हिंगे,निता हिंगे,आत्माराम कोटांगले यांच्यानेतृत्वात गेल्या दोन वर्षापासून रिक्त असलेल्या 11 शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी हे आंदोनल करण्यात आले.
या आंदोलनात विद्यार्थ्यासह पालकही सहभागी झाले होते.शाळेला कुलूप ठोकत विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील पटागणावरच शाळा भरविली.परसवाडा येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कुल असून १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण दिले.जाते.या शाळेत १९ शिक्षकांची गरज असून फक्त ८ शिक्षक सध्याच्या घडीला कार्यरत आहेत.११ शिक्षक कमी असल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,ही बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,सीईओ,शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे वांरवार लक्षात आणून दिली गेली.परंतु त्यांनी दुर्लक्षच केल्याने शाळेला कुलूप ठोकण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया पालकानी व्यक्त केली.पालकासंह शाळा व्यवस्थापन समितीने जोपर्यंत शिक्षक देत नाही,तोपर्यंत शाळेचा कुलूप उघडणार नाही व विद्यार्थी शाळेत जाणार नाही ही भूमिका घेतल्यामुळे तिरोडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्पुरते 4 शिक्षक देण्याची मागणी मान्य करीत तसे लेखी पत्र दिले.त्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.