महिला संरक्षण कायदा पुरुष विरोधी नाही-विजया रहाटकर

0
18

नागपूर, दि. 11 : निकोप व भयमुक्त वातावरणात काम करणे हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण’ हा कायदा महिलांचे संरक्षण करतो. हा कायदा पुरुषांच्या विरोधात नसून मानवतावाद, नैतिकता आणि न्याय यांच्यांशी विसंगत वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात शासकीय कार्यालयातील महिला तक्रार निवारण समित्यांचे अध्यक्ष, सदस्य तसेच कार्यालय प्रमुखांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनूप कुमार,जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉ. कादंबरी बलकवडे, महिला आयोगाच्या सदस्या निता ठाकरे (नागपूर परिक्षेत्र), महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त एम.डी.बोरखडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त आप्पासाहेब धुळाज तसेच महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच शासकीय कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना विजया रहाटकर म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरात झालेल्या लैंगिक छळाबाबत समितीकडे तक्रार दाखल करता येते. हा कायदा संघटित व असंघटित क्षेत्र या दोन्ही ठिकाणी लागू होतो. दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या ठिकाणाच्या तक्रारी जिल्हा तक्रार निवारण समितीकडे जावू शकतात. शासकीय कार्यालयात सर्व घटकांमध्ये कायदयाविषयी जागरुकता निर्माण करणे ही समितीची मुख्य जबाबदारी आहे.
महिलांचे सक्षमीकरण, त्यांचा आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोगाच्या वतीने काम केले जाते.आज अंगण ते अंतराळात महिलांनी भरारी घेतली आहे. कुटूंबातील निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढलेला आहे. परंतु आजही विविध प्रकारे स्त्रियांचे शोषण सुरु आहे. यासाठी स्त्रियांमध्ये अन्यायाला वाचा फोडण्याची शक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. आयोगाच्या वतीने स्त्रियांच्या समस्यांवर उपाय शोधले जावून ते शासनापर्यंत पोहचविले जातात.त्याचेच पुढे कायदयात रुपांतर होते. यापूर्वी पाळणाघरांच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही
ठोस कायदे नव्हते. परंतु आता आयोगाच्या मागणीवरुन शासनाच्या वतीने लवकरच पाळणाघराबाबत कायदा अंमलात आणण्यात येईल. मुळात कोणताही कायदा हा निरपेक्षच असतो. कायद्यामुळे नागरिक जबाबदार बनून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी पुढे येतात, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
महापौर श्रीमती नंदा जिचकार म्हणाल्या की, समाजाच्या सुदृढीकरण्यासाठी कायदे बनवावे लागतात. कार्यालयात पोषक वातावरण मिळाल्यास स्त्रियांची कार्यक्षमता अधिक वृद्धिंगत होईल. बरेचदा स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता केल्यास बदनामी होईल, ही भिती असते. त्यामुळे आरोपींची हिंमत अधिक वाढत जाते. यासाठी सर्वप्रथम स्त्रियांनी आपल्यावर होणाऱ्या
अन्यायाविरुद्ध दाद मागायला हवी. तसेच अशीच परिस्थिती दुसऱ्या महिलेवर आल्यास तिलाही मार्गदर्शन करुन पाठिंबा द्यायला हवा. कामाच्या ठिकाणीमहिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 या कायदयामुळे स्त्रियांना छळमुक्त वातावरणात मोकळेपणाने काम करण्याचा अनुभव घेता येणार आहे.यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार,जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, सदस्या निता ठाकरे, उपायुक्त एम.डी.बोरखडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ‘पोलिसांची महिलांसाठी मदतीची भूमिका’, ‘कौटुंबिक हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण कायदा’, ‘स्टॉप सेक्युअल हर्रासमेंट’ आणि ‘महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कायदा’ या विषयांच्या भित्ती पत्रकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनीभागात ही भित्तीपत्रके लावून महिलांच्या संरक्षणाबाबत जनजागृती
निर्माण करावी, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.
यावेळी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण) अंतर्गत तक्रार निवारण समिती मार्गदर्शिका, ‘सेक्सुअल हर्रासमेंट ॲट वर्क प्लेस, ही माहिती पुस्तिका तसेच पीपल्स युनायटेड अगेन्स्ट सेक्सुअल हर्रासमेंट (पुश) या सीडीचे वितरण प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेत करण्यात आले. कार्यशाळेमध्ये पहिल्या सत्रात श्रीमती अर्चना गोंधळेकर यांनी ‘कायदेशीर तरतूदी आणि अंमलबजावणी’ याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली मोरे यांनी केले तर आभार जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय परदेशी यांनी मानले.