राज्याचे ‘गणित’, ‘इंग्रजी’ बिघडलेलेच!

0
19

मुंबई- देशातील ग्रामीण आणि शहरी भागात शालेय शिक्षणातील गुणवत्तेचे अद्यापही वाभाडे निघत असल्याची धक्कादायक माहिती ‘प्रथम फाऊंडेशन’ने मंगळवारी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या ‘असर-२०१४’ या अहवालातून समोर आली आहे. राज्यात शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत मागील वर्षातील परिस्थितीत किंचितही फरक पडलेला नाही. गणितात अवघा एक टक्का सुधारणा झाली आहे. मात्र सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्याने देशात बरीच सुधारणा केली असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा सविस्तर अहवाल २६ जानेवारी रोजी मुंबईत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रथम संस्थेच्या संचालिका (प्रशिक्षण) उषा राणे यांनी दिली.
देशातील पाचवीच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीचे साधे वाक्यही वाचता येत नाही, तर तिसरीतील २६ टक्के विद्यार्थ्यांना देान अंकी गणित सोडवता येत नसल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून पुढे आली आहे. राज्यात मागील वर्षातील शैक्षणिक गुणवत्तेतही घसरण कायम असल्याचे दिसून आले आहे. देशातील शाळांच्या तुलनेत राज्यातील पाचवीच्या ४६.५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या दर्जाचे वाचन येत नाही, तर आठवीतील अवघे ३२.९ टक्के विद्यार्थी भागाकाराची साधी गणिते सोडवू शकतात, तर याच वर्गातील केवळ २२.८ टक्के विद्यार्थी इंग्रजीतील छोटे शब्द वाचू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. ‘प्रथम’कडून देशभरातील शैक्षणिक परिस्थितीची पाहणी करून अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत निकष ग्राह्य धरले जातात.
राज्यात गणित विषयात एक टक्का सुधारणा झाली आहे. मात्र इंग्रजीची घसरण अजूनही कायम आहे. तर वाचनाच्या स्तरातही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले आहे. चौथीच्या ६८.८ टक्के विद्यार्थ्यांना पहिलीच्या धडय़ाचे योग्य वाचन करता येत नाही, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांचीही अवस्था अशीच असून, पाचवीचे ५६.२ टक्के विद्यार्थ्यांना तिसरीच्या पुस्तकाचे वाचन करता येत नाही. गेल्यावर्षी चौथीतील ७१.१ टक्के मुले आणि पाचवीतील ६१.१ टक्के मुले वाचू शकत होती.