एव्हरेस्टवीराचं कुटुंब वाळीत

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

रायगड : रायगड जिल्ह्यातील वाळीत टाकण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत. रोहा तालुक्यातील खाजणीमध्ये वाळीत टाकलेल्या एका महिलेनं आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच पोलादपूर तालुक्यातील भोगाव इथं एका दाम्पत्याला वाळीत टाकलं आहे.

बदलत्या जीवनशैलीत महिलांनी जिन्स, टी-शर्ट घालणं तसं काही नवीन नाही. आणि त्याबद्दल आज तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. पण लग्नानंतर जिन्स आणि टी-शर्ट घातल्यामुळं पती-पत्नीला वाळीत टाकण्यात आलं आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव इथं हा प्रकार घडला आहे. राहुल येलंगे आणि पोर्णिमा यांनी अंतरजातीय विवाह केला. पुण्याचा झगमगाट सोडून गावात राहण्याचा निर्णय घेतला. पण गावकऱ्यांनी वाळीत टाकून त्यांचा छळ सुरु केला आहे.

गावकऱ्यांच्या या छळामुळं पौर्णिमा हतबल झाली आहे. त्यामुळं तीला रडू कोसळलंय. पौर्णिमा उच्चशिक्षित तर आहेच, शिवाय उत्तम गिर्यारोहकही. राहुलही तसा शिकला सवरलेला. 2012 साली त्यानं ऐव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. तत्कालीन राष्ट्रपतींकडून त्याचा गौरवही झाला. पण इथं मात्र गावगाड्याबाहेर राहण्याची वेळ आली आहे.

गावच्या सरपंचांनी मात्र येलंगे कुटुंबाचे सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि प्रकरणाची काहीच माहिती नसल्याचं सांगून हात झटकलेत.

हजारो मीटर उंचीचा ऐव्हरेस्ट सर करतानाही राहुलला जेवढा त्रास झाला नाही, त्यापेक्षा कितीतरी वेदना कमी उंचीच्या माणसात वावरताना होत आहेत. त्यामुळं ऐव्हरेस्ट पादाक्रांत करुन जगभरात ठसा उमवटणाऱ्यांना गावातील आपली माणसं कधी आपलं म्हणतील हाच प्रश्न आहे