अभाविपने दाखविले शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे

0
8

गडचिरोली,दि.०५-: विद्यापीठाच्या निवडणुका घेण्याचा केलेला केवळ गाजावाजा आणि शिक्षणासंदर्भात भरीव कार्य करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून  भाजपची पितृसंघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात नारेबाजी करुन काळे झेंडे दाखविले. जिल्हा संयोजक हर्षल गेडाम, नगरमंत्री साहिल धाईत यांच्या नेतृत्वात ना. तावडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. पाच प्रमुख कार्यकत्र्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये  साहिल धाईत, न्युटन मंडल, नगर संघटनमंत्री तेजस मेहरकुरे, सुरज काटवे यांचा समावेश आहे. आंदोलनात चेतन कोडवते, चिराग नंदेश्वर, गोपाल देशमुख अतुल मडावी, योगेश ताराम सहभागी झाले होते.

गोंडवाना विद्यापीठाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, तसेच वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज गडचिरोलीत आले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काळे झेंडे दाखवून नारेबाजी केली. ‘शिक्षणमंत्री तुम होश में आओ, कुछ काम करो, वर्ना खुर्सी खाली करो’, अशा घोषणा देत अभाविप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कार्यक्रम संपेपर्यंत स्थानबद्ध केले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.