अखेर जि.प.शाळेचे ‘ते’ तीनही शिक्षक निलंबित

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.07ः-अर्जुनी मोरगाव पं.स. अंतर्गत येणार्‍या तीन शिक्षकांचे निलंबनाचे प्रस्ताव ६ ते ७ महिन्यापासून जि.प. कडे पाठवूनही काहीच कारवाई होत नसल्याचे पाहून सभापती अरविंद शिवणकर यांनी ६ डिसेंबर रोजी शिक्षण विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. यावर जिल्हा परिषद प्रशासनाने चांगलाच धसका घेतला असून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तात्काळ निर्णय घेवून त्या तीनही शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश ४ डिसेंबर रोजीच काढले. त्यामुळे सभापती अरविंद शिवणकर यांनी आपले आंदोलन स्थगीत केले आहे.
निलंबित करण्यात आलेले शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा माहुरकुडाचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक ए.एम. चौधरी यांनी पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे गैरहजर राहणे, सादिलवार व सर्व शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक सत्र २0१२-१३ व २0१३-१४ या कालावधीतील जमा खर्चाचे हिशोब न जुळणे, शालेय कामाकडे दुर्लक्ष करणे, आर्थीक व्यवहारात अनियमितता बाळगणे, प्रशासकीय कामे नियमानुसार पार न पाडणे, शैक्षणिक कार्य सुरळीत पाळणे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, पदीय कर्तव्याचा भंग करणे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून निलंबन काळात त्यांना त्यांचे मुख्यालय पं.स. तिरोडा येथे करण्यात आले.
त्याचप्रमाणे जि.प. प्राथमिक शाळा झासीनगरचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक ए.के. खंडाते यांनी पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे गैरहजर राहणे, शालेय दस्तावेज अद्यावत न ठेवणे, जि.प. प्रा. शाळा मुंढरी या शाळेचा मुख्याध्यापक पदाचा कार्यभार न सोपविणे, शालेय कामाकडे, दुर्लक्ष करणे, वरिष्ठाच्या आदेशाची अवहेलना करणे आदी नियमाचा भंग केल्याने त्यांनाही ४ डिसेंबर रोजी निलंबीत करण्यात आले. यांचे मुख्यालय सालेकसा येथे करण्यात आले.
त्याचप्रमाणे जि.प. प्रा. शाळा इसापूरचे प्रा. मुख्याध्यापक आर.जी. फुलबांधे हे शालेय वेळेत मद्यप्राशन करून राहतात. असा विविध नियमांचा भंग केल्यामुळे त्यांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पं.स. सालेकसा येथे निश्‍चित करण्यात आले. या तीनही शिक्षकांवर निलंबनाची तात्काळ कारवाई झाल्याने अर्जुनी मोरगाव सभापती अरविंद शिवणकर यांनी आपले ६ डिसेंबरचे कुलूप आंदोलन स्थगीत केले आहे. या निलंबन कारवाईमुळे अर्जुनी-मोर तालुक्यातील कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.