30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home शैक्षणिक गडचिरोलीतील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्त्रो’ सहल

गडचिरोलीतील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्त्रो’ सहल

0
41

गडचिरोली,दि.16 : गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील 50 विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून ‘इस्त्रो’ या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली. इस्त्रो संस्थेमध्ये गडचिरोली येथील आदिवासी विद्यार्थ्यांना भेट मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन प्रकल्पातील एकूण 43 आश्रमशाळा व दोन एकलव्य शाळेतील एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रकल्प अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून  ‘भारतभ्रमण’ या जिल्हयातील नाविण्यपुर्ण उपक्रमातून ही अभ्यास सहल आयोजित करण्यात  आली. जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आवश्यक पाठबळ वेळोवेळी दिले. गडचिरोली जिल्हयातील दुर्गम आणि आदिवासी विद्यार्थ्यांना विमानाने दक्षिण भारतातील महत्वाची ठिकाणे यावेळी दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांना जिल्हयाबाहेरील जग पाहता यावे तसेच ते जवळून अभ्यासता यावे, शालेय जीवनातच चांगल्या शिक्षणातून चांगल्या ठिकाणी काम करु शकतो याचे ज्ञान त्यांना घेता यावे हा उद्देश या सहलीचा असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. 7 ते 14 जानेवारी दरम्यान या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या अभ्यास सहलीदरम्यान दक्षिण भारतातील बँगलोर, म्हैसूर, वायनाड, कोची  या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. यावेळी ‘इस्त्रो’ अंतरळ संस्था, नेहरु प्लॅनेटॅरीयम, एअरोस्पेस संग्रालय, कोची येथील मरीन ड्राईव्ह इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. पर्यटनाचा आनंदही विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. मैसूर झू, इस्कॉन मंदिर, विविध पॅलेस, संग्रालय, बोटींग या ठिकाणीही त्यांनी भेटी दिल्या. यातील जवळजवळ सर्वच मुले अगदी गडचिरोली जिल्हयाच्या बाहेरही याअगोदर गेलेली नव्हती. या सहलीतून त्यांनी अगदी विमानाने प्रथमच  ‘भारतभ्रमण’ केले असे म्हणता येईल. मुलांना शिक्षित करणे, शिक्षणाचे गांभीर्य लक्षात आणून देणे हा सहलीचा उद्देश यावेळी यशस्वी झाला.blank

सहली वरुन परत आल्यावर भेटी दरम्यान आलेले अनुभव इतरांना सांगण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना रोड येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी मुलांशी संवाद साधला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी अभ्यास सहलीतील आलेले अनुभव जिल्हाधिकाऱ्यांशी शेअर केले. यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनात निश्चित करा असा संदेश दिला. या सहलीच्या आयोजनामध्ये सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी विशेष प्रयत्न केले. सहलीमध्ये समन्वयक म्हणून अनिल सोमनकर, भाष्कर मदनकर, गजेंद्र सोनोने, निरमा ढाकरे, सविता शेंडे यांनी काम पाहिले.

प्रतिक्रीया :-

डॉ. इंदुराणी जाखड, प्रकल्प अधिकारी- गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक कारकीर्दीमध्ये प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या अभ्यास सहीलीचे आयोजन करण्यात आले. त्यांनाही भविष्यात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील किंवा त्यांना तशा उच्च ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल यासाठी अशा अभ्यास सहलीतून त्यांची मानसिक तयारी आपोआपच साधेल.

कु.मुस्कान उइके, इ. 7 वी, सहभागी विद्यार्थी-  या अभ्यास सहलीतून आम्हाला ज्या ठिकाणी नेहण्यात आले त्या ठिकाणी काम करण्याची संधी आम्हालाही उपलब्ध होईल अशी इच्छा जागृत झाली. त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करु.चि.सत्तू मत्तामी, इ. 7 वी, लाहेरी येथील सहभागी-  मी जिल्हयाच्या बाहेर पहिल्यांदाच गेलो तेही विमानाने. मला सर्व काही नवीनच होते. मी चांगला अभ्यास करुन नेव्हीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कु.सोनमराशी कुमोती इ. 10 वी, हलेवरा-     मी इस्त्रो पाहिले, एअरोस्पेस पाहिले, यातून मला शिक्षणाचे महत्व कळून आले. भविष्यात मलाही चांगले काहीतरी करुन दाखवावे असे वाटतेय. जाखड मॅडमचे मी आभार मानते की आम्हाला त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली.