सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ७ ऑगस्टला ऑफलाईन परीक्षा

0
14

बारावी किंवा आयटीआय पात्र मुलींना संधी

         गोंदिया, दि. 04 : चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची शाश्वती देणाऱ्या 18 महिन्यांच्या कालावधीच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग या मोफत अभ्यासक्रमासाठी 17 ते 28 वयोगटातील मुलींसाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा ॲडव्हान्स डिप्लोमा प्रशिक्षणासाठी सात ऑगस्ट रोजी ऑफलाईन परीक्षा आयोजित केली आहे. या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

        अमरावती व नागपूर विभागातील महिला व युवतींकरीता सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचे निवासी प्रशिक्षण देण्याबाबत अमरावती व नागपूर विभागातील १७-२८ वयोगटातील कोणत्याही शाखेतून १२ वी पास (विज्ञान, कला अथवा वाणिज्य),  औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा पॉलिटेक्निकचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींकरीता सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा ॲडव्हान्स डिप्लोमाचे १८ महिण्यांचे निवासी प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य राहणार आहे. पालक शासकीय क्षेत्रातील नोकरीत असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

        सदर प्रशिक्षणाची वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे- प्रशिक्षण कालावधी १८ महिणे, निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटाप दिले जाईल, प्रशिक्षीत व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर, प्रशिक्षण व मुल्यमापनानंतर नामांकित कंपनी/ स्टार्ट अप मध्ये रोजगाराची हमी असणार आहे.

         प्रशिक्षणार्थींची निवड प्रमाणीत केलेल्या विहीत निवडप्रक्रियेद्वारे करण्यात येणार असून याकरीता सर्वप्रथम चाळणी परीक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेचा अभ्यासक्रम इयत्ता १० वी पर्यंतचे इंग्लिश व गणित यावर आधारीत आहे. आता ऑनलाईन परीक्षेचा कालावधी संपुष्टांत आल्यामुळे व ज्या पात्र महिला व युवतींनी अद्यापपावेतो ऑनलाईन अर्ज केलेला नाही अशा पात्र महिला व युवतींकरीता ऑफलाईन परीक्षा रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्रावर आयोजीत करण्यात येणार आहे. तरी पात्र महिला व युवतींनी वैध फोटो आयडी (आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायविंग लायसन्स, फोटो असलेले बँक पासबुक) घेऊन नजीकच्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्रावर सकाळी परीक्षेच्या १ तास आधी म्हणजेच १० वाजता उपस्थित राहावे.
उपस्थित महिला व युवतींना त्यांची पात्रता आणि वैध फोटो आयडी तपासून प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यांत येईल. सदर परिक्षेचा अभ्यासक्रम इंग्लिश मौखिक मुलाखत व १० वी पर्यंतचे गणित असा असेल. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या आणि पालकांच्या मुलाखती घेतल्या जातील ज्याद्वारे महिला व युवतींची अंतिम निवड करण्यात येईल.

          जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक महिला व युवतींनी नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं. २१०, आमगांव रोड, गोंदिया-४४१६०१, दुरध्वनी क्र. ०७१८२-२९९१५० किंवा ९२८४३२३१४१ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयात संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.