चंद्रपूर दि.९: प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे मागील पाच वर्षात तब्बल ३४३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची बाब जिल्हा सामान्य रुग्णालयातून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीवरून उजेडात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ता राजेश बेले यांनी ही माहिती मागितली होती. प्रदूषण दिवसेंदिवस आणखी वाढत असतानाही त्याला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षारोपण गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वृक्षारोपण कार्यक्रमात हयगय केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ते पुढे म्हणाले, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. मात्र या वृक्षांचे जतन व संवर्धन केले जात नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष अल्पावधीतच नष्ट होऊन जातात. महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावर लावलेले पाम ट्री त्याचेच उदाहरण आहे. जिल्ह्यात प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे लक्षण दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार दमा, ह्दयविकार, अॅसीडीटी, त्वचा रोग, टीबी यासारखे आजारांमुळे २०११-१२ मध्ये ६६ जणांचा, २०१२-१३ मध्ये १०२ जणांचा, २०१३-१४ मध्ये ९० जणांचा, २०१४-१५ मध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालामध्ये मृत्यूला कारणीभूत दूषित पाणी व वायू प्रदूषण ठरविण्यात आले आहे.
वाढते प्रदूषण कमी करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणा दाखवित असल्याचा आरोप बेले यांनी यावेळी केला. एकीकडे औद्योगिकरणाला चालना देण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रित करताना उदासीनता दाखविली जात आहे. सीटीपीएस चंद्रपुरात आहे. प्रदूषणाचा सामना चंद्रपूरकरांना करावा लागत आहे. तरीही विजेच्या वापरात सबसीडी दिली जात नाही, याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला स्वप्नील पटेल, सुदर्शन बोरीकर, फिरोज शेख, अमित रस्तोगी आदी उपस्थित होते.