‘जय’मुळे पवनी तालुक्यात वाघांची संख्या वाढली

0
12

पवनी दि. २५ : न्यू नागझिरा अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचे अंतर आणि अडथळे पार करून उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात दोन वर्षापूर्वी ‘जय’ नामक वाघ दाखल झाला आहे. या वाघामुळे अभयारण्यात व पवनी वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काही महिन्यापूर्वीच वायगाव बीटमध्ये एका वाघीणीने दोन बछड्यांना जन्म दिल्याने शावकांची संख्या १० च्यावर गेली आहे. यातील पाच शावक पवनी तालुक्यात आहेत.

भारदस्त शरीरयष्टीचा साडेचार, पाच वर्षाचा ‘जय’ नामक वाघ या परिसरातील महत्वपूर्ण वाघ ठरला आहे. पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात ‘जय’ दाखल झाल्यानंतर त्याची सर्वप्रथम मैत्री झाली येथील टी – ५ नामक वाघीणीशी. या वाघ वाघीणीचे जोडपे अनेकांच्या दृष्टीस पडले. ‘जय’पासून या वाघीणीला मागील पावसाळ्यापूर्वी दोन शावक जन्माला आले. हे शावक वाघीणींसोबत खेळताना अनेकांनी पाहिले होते.

‘जय’ नामक वाघ हा दूरदूरपर्यंत बिनधास्तपणे फिरत असताना उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जंगलातील ‘चांदी’ नामक वाघीणीच्या संपर्कात आला. ‘जय’पासून ‘चांदी’ वाघीणीने चार शावकांना जन्म दिला. याच अभयारण्यातील कुही मांढळजवळील जंगलातील टी-फोर नामक वाघीणीसोबतही ‘जय’ची गट्टी जमली. या वाघीणीनेही दोन शावकांना येथे जन्म दिला. प्रादेशिक वनविभागाच्या रनाळा तलाव परिसरात वाघीणीचे वास्तव्य आहे. या वाघीणीचाही ‘जय’ वाघासोबत संपर्क आला असून या वाघीणीने पवनी वनक्षेत्रातील वायगाव बीटात दोन शावकांना काही महिन्यापूर्वी जन्म दिला. या वाघीणीकडे वनविभाग लक्ष ठेवून आहे. हीच वाघीण दोन शावकांसोबत गुडेगाव नजीकच्या जंगलात फिरत आहे.