स्वस्त विजेसाठी विदर्भवादी आता देणार लढा

0
11

गडचिरोली दि. २५: राज्यातील सर्वाधिक ५ हजार ६०० मेगावॅट वीज विदर्भात निर्माण होते. या विजेवर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व पुणे यांना वीज पुरवठा केला जातो. केवळ २२०० मेगावॅट वीज विदर्भात वापरली जाते. उर्वरित वीज राज्याच्या इतर भागात जाते. यात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी व गळती होत आहे. त्यामुळे विजेचे भाव वाढतात. मात्र हे वाढलेल्या भावाची रक्कम विदर्भातील जनतेच्या खिशातून वसूल केली जात आहे. या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भात चार ठिकाणी वीज प्रकल्प आहेत. या वीज प्रकल्पांमुळे कोळसा, पाणी यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. प्रदूषणातही वाढ झाली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने केलेल्या अभ्यासानुसार प्रति युनिट वीज निर्मितीसाठी केवळ २.४० पैसे खर्च येतो. असे असतांना विजेचे दर ३ रूपयांपासून ११ रूपयांपर्यंत आकारले जात आहेत. ही विदर्भातील जनतेची लुट आहे. या विरोधात ३ आॅक्टोबरला नागपूर येथे व ९ आॅक्टोबरला अकोला येथे आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर २५ आॅक्टोबर रोजी वणी येथे कोळसा रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामुळे वीज प्रभावित झाल्यानंतरच सरकारला येथील वीज प्रकल्पांची किंमत कळेल. या आंदोलनाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर बैठका घेण्यात येत असल्याची माहिती राम नेवले यांनी दिली. यावेळी अरूण मुनघाटे, अनिल तिडके, विष्णु आष्टीकर, नामदेवराव गडपल्लीवार, रमेश भुरसे, राजेंद्रसिंह ठाकुर, राजू जक्कनवार, श्याम वाढई, सुधाकर नाईक, रमेश उप्पलवार आदी उपस्थित होते.