नक्षल कारवायात घट, आत्मसमर्पणाचा आलेख उंचावला

0
8

 

 

 पोलिसांच्या विशेष रणनीतीचे यश
 नक्षल चळवळीला हादरा

नागपूर, ,दि.१३ः गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला आळा घालून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त होत आहे. मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षल कारवायांमध्ये घट तर झालीच शिवाय गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पणाचा आलेख उंचावला आहे. त्यातच पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या नवजीवन पंधरवाड्यामुळे अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नक्षल्यांच्या चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच या जिल्ह्यांचा जलद गतीने विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे नक्षल चळवळीत भरकटलेल्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून शासनाच्या विकास कामांना हातभार लावण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदा २०१५ या वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत नक्षल्यांकडून करण्यात येणा-या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच नक्षल्यांकडून आत्मसमर्पण करण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पोलिसांची विशेष रणनीती यशस्वी झाल्याचे चित्र आहे.
सन २०१२ या वर्षात ११६ घटना नक्षल्यांकडून घडवून आणण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत २०१३ या वर्षात नक्षल घटनांना आळा घालण्यात यश आल्यामुळे हा आकडा ९० वर स्थिरावला. २०१४ या वर्षात ७२ घटना घडल्या. तर यंदाच्या वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत पोलिसांकडून राबविण्यात येणा-या कार्यप्रणालीमुळे ५७ घटनांपर्यंत नक्षल्यांना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. सोबतच नक्षल चळवळीत असणा-यांना शस्त्र खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याकरीता पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी नक्षल्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी भेटी देऊन नक्षल्यांच्या नातेवाईकांपर्यंत आत्मसमर्पणाचा संदेश पोहचवित आहेत. तसेच आत्मसमर्पण योजनेची माहिती विविध माध्यमांच्या माध्यमातून पोहचवून नक्षल्यांना नक्षल चळवळीत कशी दिशाभुल होत आहे, हे पटवून देण्यात यश येऊ लागले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम चळवळीत काम करणा-या नक्षल्यांमध्ये होऊ लागला आहे. मागील चार वर्षात १५० नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया सोडून आत्मसमर्पणाचा मार्ग अवलंबिला आहे. सन २०१२ या वर्षात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात गडचिरोली १४, चंद्रपूरातील १ व यवतमाळातील १ नक्षलवाद्याचा समावेश आहे. २०१३ या वर्षात एकूण ४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यात गडचिरोलीतील ४८ व गोंदियातील १ नक्षलवाद्याचा समावेश आहे. सन २०१४ या वर्षात एकूण ४० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गडचिरोलीतील ३७ व गोंदियातील ३ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सन २०१५ या वर्षात हा आलेख उंचावला असून नोव्हेंबरपर्यंत एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ४५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या मार्गावर असून लवकरच हा आलेख वाढेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

एकीकडे आत्मसमर्पणावर पोलिसांनी भर दिला असतांनाच केवळ बंदुकीवर विश्वास ठेवणा-या नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मागील चार वर्षात पोलिसांनी हिंसक कारवाया करणा-या २३९ नक्षल्यांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली आहे. त्यात सन २०१२ या वर्षात १२६ नक्षलवादी व समर्थकांना अटक करण्यात आली. तर २०१३ या वर्षात ५८, २०१४ या वर्षात २९, तसेच २०१५ या वर्षात आत्तापर्यंत जवळपास ३० नक्षलवादी व समर्थकांना जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.