अस्पृश्यता पाळण्यात भाजपप्रणीत सरकार आघाडीवर

0
9

नवी दिल्ली- संविधानातील तरतुदीमुळे समाजातील जातीपातीतील अस्पृश्यता ६४ वर्षांपूर्वी संपुष्टात आली असली तरीही ती खरच संपली आहे का हा एक प्रश्नच आहे. भारतात आजही प्रत्येक चौथा माणूस अस्पृश्यता पाळतो, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास प्रत्येक धर्मातील आणि जातीतील लोकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले असून त्यामध्ये मुसलमान, अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांचाही समावेश आहे.

ब्राह्मणांमध्ये अस्पृश्यता पाळण्याचे सर्वाधिक प्रमाण असून त्यापाठोपाठ ओबीसींचा क्रमांक लागतो. तर धर्मानुसार हिंदू, शिख आणि जैन धर्मपंथीय नागरिक सर्वाधिक अस्पृश्यता पाळतात. इंडियन नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) ही संस्था व युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, अमेरिका यांनी सुमारे ४२ हजार घरात जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. १९५६ साली स्थापन झालेली एनसीएईआर ही देशातील सर्वात जुनी व मोठी नॉन-प्रॉफिट इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युट आहे. २०१५ साली या सर्वेक्षणातील संपूर्ण माहिती समोर येऊ शकेल.
अस्पृश्यता पाळण्यात मध्यप्रदेश राज्याचा सर्वात वरचा क्रमांक (५३ टक्के) लागतो, त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश (५० टक्के), छत्तीसगड (४८ टक्के), राजस्थान व बिहार (४७ टक्के), उत्तर प्रदेश(४३ टक्के) आणि उत्तराखंड(४० टक्के) यांचा क्रमांक लागतो. याबाबतीत पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात प्रगत राज्य असून या राज्यातील अवघ्या १ टक्के नागरिकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे सांगितले, तर २ टक्के लोकांसह केरळचा याबाबतीत दुसरा क्रमांक, ४ टक्के लोकांसह महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. उत्तरपूर्व राज्यातील ७ टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये फक्त १० टक्के नागरिक अस्पृश्यता पाळतात.
या सर्वेक्षणादरम्यान लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील पहिला प्रश्न होता, तुमच्या कुटुंबात कोणी अस्पृश्यता पाळतं का? याचे उत्तर ‘नाही’ असे मिळाल्यास त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला, आणि तो होतास अनुसूचित जातीतील एखाद्या इसमाने तुमच्या स्वयंपाकघरात शिरलेले किंव्या तुमची भांडी वापरलेले तुम्हाला चालेल का? संपूर्ण भारतभरात केल्या गेलेल्या या सर्वेक्षणादरम्यान २७ टक्के लोकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले. आणि हा प्रकार ब्राह्मणांमध्ये सर्वाधिक (५२ टक्के) दिसला तर ब्राह्मणेतर लोकांपैकी २४ टक्के लोकांनीही आपण या ना त्या प्रकारे अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले.
विशेष बाब म्हणजे, ओबीसी नागरिकांनीही याला होकारार्थी उत्तर (३३ टक्के) देत आपल्या घरात अस्पृश्यता पाळण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले. तर अनुसूचित जाती व जमातीतील अनुक्रमे १५ व २२ टक्के नागरिकांनीही अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले.
तर विविध धर्मातील नागरिकांनी दिलेल्या उत्तरानुसार प्रत्येक तिसरा हिंदू नागरिक (३० टक्के) अस्पृश्यता पाळत असून, शिख (२३ टक्के), मुस्लिम (१८ टक्के) आणि ख्रिश्चन नागरिकही (५ टक्के) अस्पृश्यता पाळतात. या यादीत जैनांचा सर्वात वरचा (३५ टक्के) क्रमांक लागतो.