पाणपक्षी गणनेचा पहिला टप्पा : ४0 प्रजातींच्या पक्ष्यांचे झाले दर्शन

0
8

गोंदिया दि.६::  जिल्ह्यात पाणपक्ष्यांच्या गणनेचा पहिला टप्पा पार पडला. या पक्षीगणनेत सहभागी झालेले पक्षीतज्ज्ञ व निरीक्षकांनी विविध प्रजातींच्या  पक्ष्यांची नोंद करीत कॅमेराबद्ध केले. देशी-विदेशी अशा पाणथळ पक्ष्यांच्या आगमनाने जिल्ह्यातील तलावांवर सध्या पक्ष्यांची गर्दी वाढली आहे.
वन्यपशुंसह आता पक्ष्यांप्रतीही वनविभाग गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच मुख्य वनसंरक्षकांनी दरवर्षी पक्षीगणना करण्याचे आदेश काढले. त्यांच्या आदेशानुसार आता पक्षी गणना करणे वनविभागाला बंधनकारक झाले आहे. २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी पक्षीगणनेचा पहिला टप्पा पार पडला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगाव, शिरेगाव, बुरशी व श्रृंगारबन येथे पक्षीगणना करण्यात आली, तर परसवाडा, बाजारटोला, माकडी, झिलमीली, लोहारा, निलज (गोंदिया तालुका), नवतलाव (आमगाव), घुर्मरा, कटंगी, सलंगटोला (गोरेगाव), करटी, चोरखमारा (तिरोडा), झालीया (सालेकसा) या तलावांवर पक्षीगणना करण्यात आली.

पक्षी गणनेच्या पहिल्या टप्यात पक्षीमित्रांनी सुमारे ४0 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी टिपले आहेत. यामध्ये ग्रेविंग गूज, नॉर्दर्न पिंटेल, नॉर्दर्न शॉवेलर, युरेशियन विजन, गार्गेनी, कॉमन पोचार्ड, रेड क्रस्टेड पोचार्ड, टफ्टेड डक, ग्लोसी आयबीज, ब्लॅक हेडेड गल, पेंटेड स्टॉर्क, वुलीनेक्ड स्टॉर्क, ग्रे हेडेड लॅपविंग यासह अन्य पक्ष्यांचा समावेश आहे
येथील पक्षीप्रेमी व काही सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून पार पडलेल्या या पक्षीगणनेत सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी सकाळी ६ ते ११ वाजतादरम्यान पक्षी निरीक्षण केले. या निरीक्षणात त्यांनी विविध प्रजातींचे असंख्य पक्षी टिपले आहेत. विशेष म्हणजे या पक्षीगणनेत सहभागी झालेल्या पक्षीमित्रांनी मोठय़ा संख्येत पक्ष्यांचे आगमन झाल्याचे सांगितले. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पक्ष्यांचे प्रमाण थोडे कमी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवेगाव परिसरात रूपेश निंबार्ते, भिमराव लाडे, प्रा.सरद मेश्राम, प्रा.अजय राऊत, संजय शहारे, डी.डी.वानखेडे, राकेश कोल्हे , सावन बहेकार, भरत जसानी, मुनेश गौतम, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, दुष्यंत रेभे, पिंटू वंजारी, शशांक लाडेकर, चेतन जसानी, शिवोना भोजवानी, अभिजीत परिहार, राकेश डोये, जयपाल ठाकूर, संजय भांडारकर, सलीम शेख, राहूल भावे यांनी  पक्षी गणनेत सहभाग घेतला.