ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाला लाभले प्रदर्शनाचे कोंदण…

0
23

ठाणे येथे टाऊन हॉलमध्ये सुरू असलेले कोकण विभागीय विकास प्रदर्शनाला सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सामान्य ठाणेकरांचे शतकी वाटचाल करणाऱ्या टाऊनहॉल बरोबर असलेले नाते अधिक घट्ट होण्यासाठी हे विकास प्रदर्शन खुपच उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नागरिक टाऊन हॉलचे बदलेले रुपडे पाहून हरखून जात आहेत. मंगळवारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव दीपक कपूर यांनी या विभागीय प्रदर्शनाला भेट दिली आणि ठाण्यातल्या ज्येष्ठ संपादक, पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या कपूर साहेबांच्या वागण्या बोलण्यातला साधेपणा अनेकांना सुखावून गेला.

टुमदार कौलारू बंगला असलेला टाऊन हॉल या शहराची सांस्कृतिक ओळख बनून गेला आहे. या पुरातन वास्तुचे नुतनीकरण करताना त्यांचे पुरातन सौंदय जपत त्याला आधुनिकतेचा साज चढविण्यात आल्याने वास्तू आणि हॉल सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे.

मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीचे नूतनीकरण इतक्या सुंदर पद्धतीने करण्यात आले आहे की टाऊन हॉल सारखी सुंदर वास्तू मी पाहिली नाही. अशी ही सांस्कृतिक वारसा समृद्ध करणारी वास्तू आमच्या विभागीय प्रदर्शनासाठी मिळाली याचे समाधान असल्याची भावना प्रधान सचिव दीपक कपूर साहेबांनी यावेळी व्यक्त केली. या वास्तुचे प्राचीन सौंदर्य जपत हुबेहुब दगडी बांधकामासाठी खास नेवासा येथून दगड आणून काम करणाऱ्या ठेकेदार मोहन पाटील यांनी यावेळी प्रधान सचिव श्री. कपूर साहेबांचा सत्कार केला.

प्रदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी कलाकार धनंजय माने यांनी साकारलेली रांगोळी  लक्षणीय ठरली. सायंकाळी चारच्या सुमारास श्री. कपूर यांचे प्रदर्शनस्थळी आगमन झाले. कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी त्यांचे स्वागत केले. टाऊन हॉलच्या दगडी बांधकामाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीवर शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या कामगिरीची सचित्र मांडण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या थीमला साजेशी अशी जागा निवडल्याबद्दल महासंचालकांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शन पाहिल्यानंतर महासंचालकांनी ठाण्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, मिलिंद बल्लाळ आणि पत्रकार यांच्याशी संवाद साधला.

स्थानिक पातळीवरील घडामोडी शासनापर्यंत पोचविण्यात स्थानिक दैनिकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून अचूक माहिती व जनतेची मते शासनाला कळतात. त्यामुळे लघु व मध्यम दैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व विभागाच्या राज्यमंत्री आग्रही आहेत.  लहान-मोठ्या दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, मागील तीन महिन्यात पत्रकारांच्या वैद्यकीय बिलांची कामे तातडीने निकाली काढण्यात आली आहेत. पत्रकारांसाठी आणखी कोणत्या कल्याणकारी योजना आणता येतील यावर विचार सुरू असल्याचे प्रधान सचिव श्री. कपूर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी प्रदर्शनस्थळी असलेल्या अभिप्राय नोंदवहीत आपला अनुभव नोंदविला.

उच्चपदस्थ व्यक्ती ह्या त्यांच्या अनुभवाने, कर्तृत्वाने मोठी बनतात. सामान्य नागरीक, सहकारी यांच्याविषयी असलेल्या संवेदनशीलतेमुळेही ते लक्षात राहतात. याचा अनुभव काल आला. प्रधान सचिवांच्या भेटीचे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार धनंजय कासार छायाचित्रण करीत होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते टाऊन हॉलकडे जायला निघाले. छायाचित्रकार कासार यांना त्यांनी लगबगीने जाताना बघीतले. प्रदर्शन पाहत असताना प्रधान सचिवांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतानाची धडपड ते पाहत होते. पत्रकारांशी संवादानंतर समुह छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर विभागीय कर्मचाऱ्यांसमवेत देखील समुह छायाचित्रण झाले. युवा पत्रकार देखील आम्हाला तुमच्या सोबत छायाचित्र काढायचे असे श्री.कपूर साहेबांना म्हणाले. सगळ्यांचे फोटोसेशन झाल्यानंतर शेवटी प्रधान सचिव छायाचित्रकार कासारांना म्हणाले, इकडे या माझ्या सोबत फोटो काढा. गेल्या दोन तासापासून तुमची लगबग मी पाहत आहे. प्रधान सचिवांच्या ऑफरमुळे कासार हरखून गेले. दोघांचाही फोटो झाला. त्यानंतर कपूर साहेबांनी आपल्या पर्सनल ट्विटर हॅण्डलवरून प्रदर्शन आणि पत्रकार संवादाविषयी फोटो आणि मजकूर ट्विट केला. इतकेच नाही तर छायाचित्रकार कासार यांच्या धडपडीचे कौतुक करीत त्या दोघांचा फोटो ट्विट करून कपूर साहेबांनी सुखद अनुभव दिला.

 

– अजय जाधव,

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे