नागपूर-नागपूर विभागातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी येत्या १३ डिसेंबर रोजी केंद्रीय समिती येणार असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. १३, १४ आणि १५ डिसेंबर या काळात ही समिती नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील २ हजार २९ गावांना बसला. या जिल्ह्यांतील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त सचिव प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समिती येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील ५२५, चंद्रपुरातील ४४८ आणि वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४९ गावांना पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला असल्याचे अनुप कुमार यांनी सांगितले.
हेक्टरी २५ हजार मदत द्या!
उशिरा पाऊस आल्याने कापूस, सोयाबीन आणि धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाल्या रोगाचाही फटका कपाशीला बसला. ओलिताचा कापूस १० ते १२ क्विंटल यायला हवा तो केवळ ३ क्विंटलपर्यंत आला. कोरडवाहू ६ ते ७ क्विंटल यायला हवा तो केवळ २ क्विंटलवर आला. सोयाबीन ८ ते १० क्विंटल यायला हवे ते केवळ दीड क्विंटल आले. धानाचे पीकही ४० टक्केच आले आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात संत्रा पिकाचेही नुकसान झाले. संत्र्याचा मृग बहार आला नाही, आंबिया बहार गळून पडला. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये आणि संत्रा पिकासाठी हेक्टरी ६५ हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राम नेवले यांनी केली.