चित्ररूपी अभिवादन …. लोकराजाला

0
7

कोल्हापूर दि : 7- वेळ सकाळची .. कोवळे ऊन अंगावर झेलत शाहू मिलकडे जाणारी थोरा – मोठ्यांसह महाविद्यालयीन युवकांची पाऊले.. निमित्त होते… आपल्या लोकराजाला कुंचला … कॅनव्हास …. रंग …ब्रश .. इझल … आदींच्या सहायाने या कृतज्ञता पर्वात.. सकाळी ९ ते सांयकाळी ५ या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना चित्र तसेच शिल्पकलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचे …

कोल्हापूरला अभिजात चित्रकलेची मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे. चित्रकला किंवा चित्रकार म्हटले की नजरेसमोर येतात ते कलामहर्षी बाबुराव पेंटर, आबालाल रहेमान मास्तर , भाई माधवराव बागल या दिग्गज नावांनी केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील चित्रकलेच्या प्रांतांचे दालन आपल्या कुंचल्याने समृद्ध केले आहे यात शंकाच नाही .अगदी अलिकडच्या काळात या प्रातांत कार्यरत असलेल्या व भारतीय चित्रकलेत पी.एच.डी. पदवी प्राप्त करणा-या पहिल्या महिला चित्रकार दिवगंत नलिनी भागवत याही याला अपवाद नाहीत . आजही कोल्हापूरात अनेक नव्या – जुन्या पिढीतील चित्रकार कलावंत कार्यरत आहेत . महाविदयालयीन युवक ते 75 वयाच्या जेष्ठांचाही यामध्ये समावेश आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या या ‘रंगोत्सवात ‘ अनेक चित्रकारांनी आपली चित्र व शिल्पकला छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी अर्पण केली . या चित्रकर्मीना जिल्हा प्रशासनाच्यावतीने रंग , ब्रश , कॅनव्हास आदी साहित्य मोफत पुरविण्यात आले होते . या चित्ररूपी कृतज्ञता महोत्सवात सुमारे  ९० हून अधिक चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला .