महिलांना गाऊनची बंदीः५०० रुपये दंड

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी मुंबई – रबाळे परिसरातील गोठीवली गावात इंद्रायणी महिला मंडळ या संस्थेने गावात महिलांना मॅक्सी-गाऊन घालण्यावर निर्बंध लादले आहेत. हा नियम मोडणा-या महिलेला ५०० रुपये दंड करण्याचा फतवा जारी केला आहे.
औद्योगिक क्रांतीमुळे नवी मुंबईतील घणसोली आणि गोठीवली गावात ६०च्या दशकातच मोठय़ा प्रमाणात कामगार वर्ग स्थलांतरित झाला. या वर्गाबरोबर स्थानिक भूमिपुत्रांनी जुळवून घेतले. सिडकोच्या आगमनानंतर नवी मुंबईत आधुनिकता सहज स्वीकारली गेली. मात्र अनेकवेळा अस्मितेचे प्रश्नही उफाळून आले. त्यामुळे अस्तित्व टिकविण्यासाठी नवी मुंबईतील गावांमध्ये वेगवेगळे फर्मान जारी केले जाते. गोठीवली गावातील इंद्रायणी महिला मंडळाने हा फतवा जारी केला आहे.
गाऊनसारख्या उत्तान कपडयांमुळे संस्कृतीवर घाला घातला जात आहे. त्यामुळे दिल्लीतील निर्भया प्रकरण घडत असल्याचा जावईशोध लावून या कपडयांवर बंदी घालण्यात आली आहे. गावातील प्रमुख महिलांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतल्यावर या महिलांनी पुढाकार घेऊन थेट गावाच्या वेशीवर फलक लावला. हा नियम मोडणा-या महिलेवर ५०० रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यावर गोठीवली गाव अधिक
चर्चेत आले. लक्ष्मी पाटील या मंडळाच्या अध्यक्ष असून त्यांनी गाऊन घातलेल्या महिलांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकच तयार केले आहे.
गावातील घरे स्वस्त मिळतात म्हणून बारबालांनी गावातील घरांमध्ये आपले बस्तान बसवले आहे. या बारबालांमुळे अनेक कुप्रवृत्तींचा वावर वाढला होता. या बारबालांना हुसकावण्यासाठी तुभ्रे ग्रामस्थ मंडळाने पुढाकार घेतला होता. शिरवणे गावातील संतोष सुतार या तरुणाने पुढाकार घेवून मोहीम राबविली आहे. आता गावाबाहेरील महिलांमुळे भूमिपुत्र महिलाही तोकडे किंवा उत्तान कपडे घालून फिरत असल्याने पुरुषी अनाचार वाढत आहे. त्यामुळे गावात गाऊन घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थलांतरित महिला स्वत:च्या गावी गेल्यावर डोक्यावर पदर घेतात. मग नवी मुंबईत उत्तान कपडे का वापरतात असा रोखठोक सवाल इंद्रायणी महिला मंडळाने केला आहे.