५ ऑगस्टला प्रदर्शित होणार ‘तालीम’

0
12

एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ असलेली कुस्ती लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेल्या नितीन मधुकर रोकडे यांच्या ‘तालीम’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. राघूजन फिल्म्स, रोअरिंग गोट मिडिया आणि एनएमआर मूव्हिस या बेनर अंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे यांनी ‘तालीम’ चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आजच्या पिढीला केवळ मेटवरील कुस्ती ठाऊक आहे, पण खरी कुस्ती लाल मातीतच खेळली जाते. लाल मातीतील कुस्तीचा आनंद निराळाच असल्याचं सांगत रोकडे म्हणाले, “या चित्रपटाची कथा जरी कुस्ती या खेळाला केंद्रस्थानी ठेवणारी असली तरी यात बरेच मुद्दे हाताळण्यात आले आहेत. बरीच वर्षे झाली मराठी चित्रपटात कुस्ती दिसली नसल्याने ‘तालीम’मध्ये कुस्ती दाखवली जाणार आहे असंही नाही. कथेची गरज असल्यान कुस्ती या चित्रपटात आहे. कोणतीही कथा यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्यासाठी अचूक लोकेशन्सची आवश्यकता असते, त्यामुळे ‘तालीम’साठी पोषक असलेल्या लोकेशन्सचा शोध आमच्या टिमने घेतला. त्यानुसार भोर, जुन्नर, कुंडल-सांगलीमध्ये चित्रीकरण केलं आहे. या चित्रपटातील लोकेशन्स आजतरी कधीही पडद्यावर आलेले नसल्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतील याबाबत शंका नाही. ‘तालीम’चा विषय आजच्या तरूणाईपासून ज्येष्ठांनाही आवडेल असा आहे. या विषयाला सुमधुर गीत-संगीतासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.’’

‘तालीम’मध्ये अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, विष्णू जोशीलकर, छाया कदम, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन आणि संकलनाबरोबरच या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन मधुकर रोकडे यांनी लिहिली असून सिकंदर सय्यद, अभिजीत कुलकर्णी नितीन रोकडे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. फारूख खान या चित्रपटाचे केमेरामन आहेत. ‘तालीम’मध्ये एकूण 5 गीतांचा समावेश असून सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याने ही गीते लिहिली असून संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी या गीतांना संगीत दिले आहे. आदर्श शिंदे, तरन्नुम मलिक, रोंकणी गुप्ता, स्वप्निल गोडबोले, दिव्यकुमार, कल्पना पोटवरी, आनंदी जोशी, फरहाद भिवंडीवाला आणि अभिरूप या गायक-गायिकांनी ही गीते गायिली आहेत.