दि. 25 जानेवारी हा दिवस दरवषी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. या स्थापनेचा ‘25 जानेवारी’ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण करणे. नवीन पात्र तरुण मतदारांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणे. तसेच मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग नोंदवता यावा हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोटनिवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भरतीय नागरिकाला आहे.
सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने ‘25 जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे सूचित केले आहे. त्यानुसार यावर्षी 15 वा राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात येत आहे. मतदानाचा हक्क आणि भारताच्या लोकशाहीचाही उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. राष्ट्रीय मतदार दिनाची यंदाची थीम ‘नथींग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ (मतदानासारखे काही नाही, मी अवश्य मतदान करणार) ही आहे.
देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना, मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत आपले नाव नोंदविले नाही, अशा नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते.
वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाधिक तरूणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा नियमितपणे होणाऱ्या पुनरिक्षण कार्यक्रमच्या कालावधीत आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिनानिमत्त संकल्प करुयात, आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊयात…! मतदारांनी भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा…!
– संकलन
जिल्हा माहिती कार्यालय, परभणी