राष्ट्रीय महामार्ग 66 चौपदरीकरण 19 खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटप

0
43
रत्नागिरी, दि. 25 : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील 19 खोकेधारकांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एकूण 67 लाख 35 हजार 545 मोबदल्यांचे धनादेश वाटप करण्यात आले.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या कामाची सुरुवात सन 2014 पासून झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 12 गावांचा समावेश असून संगमेश्वर तालुक्यामधील 22 गावांचा समावेश आहे. भूसंपादन प्रक्रियेमध्ये रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या खातेधारकांना त्यांच्या जमिनीचा तसेच जमिनीवरील त्यांच्या मालकीच्या संसाधनांचा मोबदला देण्यात आलेला आहे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शासकीय जागेमधील खोकेधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला शासनाकडून देण्यात आलेला नव्हता. त्यामूळे या खोकेधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग यांची बैठक घेवून संबंधित खोकेधारकांची पहाणी करुन मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या. त्याअनुषंगाने पालकमंत्री श्री. सामंत यांनी वारंवार बैठका घेवून आढावा घेतला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी देखील संबंधित विभागांची वेळोवेळी बैठक घेवून संबंधित खोकेधारकांना मोबदला मिळवून देण्याबाबत पाठपुरावा केला.
राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील मुंबई येथे संबंधित सर्व विभागांची बैठक घेवून नुकसानग्रस्त खोकेधारकांना मोबदला मिळवून देण्याबाबत सकारात्मक सूचना दिल्या.
आमदार किरण सामंत यांनी देखील बांधकाम भवन, मुंबई येथे बैठक घेवून खोकेधारकांना मोबदला देण्याबाबत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
संगमेश्वर तालुक्यांमधील 9 गावांमधील 80 खोकेधारकांपैकी 23 खोकेधारकांचा मोबदला शासनाकडून मंजूर करण्यात आला असून त्याचा निधी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला आहे. उर्वरित खोकेधारकांचा मोबदला लवकरच मंजूर होऊन त्यांना देखील मोबदला वाटपाची कार्यवाही करण्यात येईल.
आज 19 खोकेधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाद्वारे मोबदला वाटप करण्यात आला त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
कीर्ती राजेंद्र कुळये, जयंत बाळकृष्ण कुलकर्णी, प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी, संतोष जयसिंग आंबोरे, दत्तात्रय विश्राम आंबवकर, बाळकृष्ण बाबू बामणे, मनोहर वसंत कुंभार, दिलीप कृष्णा पेंढारी, प्रकाश बाळ घडशी, विजय यशवंत गीते, अनंत सखाराम वेलवणकर, पुरुषोत्तम गुणाजी घडशी, मनोहर सोनू गीते, श्रीकांत टोलू घडशी, संजय अनंत घडशी, मंगेश सोमा सीतप, गणपत मुगू खापरे, मनोहर शांताराम रेडीज, विनायक अनंत रहाटे