“वीरस्त्री” लताताई देशमुख..स्त्री ते सुपर वुमन…

0
63
आपला भारत देश सुरुवाती पासूनच शांती आणि अहिंसेची शिकवण देणारा देश म्हणुन जगभर प्रसिद्ध आहे. स्त्री-शक्तीचे महत्त्व अनादी काळापासून सर्वांना समजलेले आहे. आपल्या परंपरेत म्हटलेले आहे, 

“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। 
यत्र एताः तु न पूज्यन्ते सर्वाः तत्र अफलाः क्रियाः॥”

   जेथे स्त्रियांना योग्य मानसन्मान देऊन पूजनीय समजले जाते तेथे देवतांचा म्हणजे शक्तींचा वास असतो. या उलट जेथे स्त्रीला हीन लेखून तिच्यावर अत्याचार केला जातो तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात. म्हणूनच देशात मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. कालांतराने कालचक्रानुसार मानसाला हक्क गाजवण्याचा आणि पुरुषी अहंकाराचा इतका गर्व झाला की, मातृसत्ताक व्यवस्थेतून पुरुषांनी पद्धतशीरपणे स्त्रीला बाजुला सारले. विविध रूढीमध्ये तिला बंदीस्त करुन गुलाम बनविले आणि पितृसत्ताक पद्धती उदयास आली. असं इतिहास सांगतो. हे सर्व सांगायचे कारण हेचं की, स्त्री कधीच अबला नव्हती फक्त तिच्यावर अनेक बंधने रूढी परंपरेच्या जोखडात तिला बंदिस्त करून टाकले होते. याचे अनेक दाखले आपल्याला अभ्यासाअंती इतिहासात मिळतात.
स्त्री मधील हाच कणखरपणा बाणेदारपणा प्रसंगी स्वरक्षणासाठी घेतलेली लढवय्यी भूमिका कायमच लक्षात राहते. कर्तबगारीचे हे सर्व गुण घेऊन आज डिजिटल काळात स्त्री ही आपली भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व क्षेत्रात उमटवत असताना आपल्याला दिसते. स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांच्या उत्थानासाठी अनेक संस्था संघटना कार्यरत आहेत आणि ते आपली कार्य पार देखील पाडत आहे. परंतु त्यातही ज्या स्त्रिया विधवा, घटस्फोटीत परितक्त्या, एकल आहेत त्यांच्या समस्या आणखीनचं  वेगळ्या आहेत. हे ओळखून आमच्या ताई लताताई देशमुख यांनी १ मे २००४  रोजी यामधीलचं चार विधवांना घेऊन ‘स्वामिनी विधवा विकास मंडळ’ याची स्थापना केली आणि त्या माध्यमातून या स्त्रियांना त्यांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या शासनाकडून त्यांना मानाचे जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी ताई आपल्या सहकाऱ्यांसोबत अहोरात्र झटत होत्या  स्त्री म्हणजे त्याग, आधार, शक्ती, ममता याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे लताताई खरं पाहता त्या निमशासकीय नोकरी करीत होत्या त्यांना कसलाही गरज नव्हती परंतु अन्यायाविरुघ्द लढण्याचे बाळकडू चं जणु लहाणपणी चं त्सांना मिळाले. त्यात ही  स्त्रीचं काळीज आणि संवेदनशील मन असल्यामुळे समाजात स्त्रियांची होत असलेली पिळवणूक खोट्या मानपानासाठी  होत असलेली होरपळ त्यांनी ओळखली होती.याचाचं परीपाक म्हणुन त्यांनी स्रीयांच्या उत्थानासाठी संस्था स्थापण केली. 
त्या संस्थेचे नाव त्यांनी स्वामिनी ठेवले हे यासाठी की स्वामी म्हणजे मालक नवरा असा अर्थ अभिप्रेत होतो म्हणून “स्वामिनी” म्हणजे मालकिन जी स्वतःसाठी न्यायासाठी, हक्कासाठी आवाज उठवण्याची क्षमता ठेवते. म्हणून संस्थेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठेवलं ‘चला उमेदीने जगूया’ या ब्रीदवाक्यानुसार स्त्रियांच्या हक्कासाठी अहोरात्र ताईंचे कार्य सुरू होते. समाज कितीही प्रगल्भ झाला. तरी काही गोष्टी फक्त भाषणात सांगण्या पुरत्याचं राहिल्या आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा आपला सो कॉल्ड समाज सहसा तयार होत नाही.परंतु ताईंनी सातत्याने लढा देऊन आंदोलने करून अनेक विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या एकल स्त्रियांना न्याय दिला त्यांचे मजबूत संघटन बांधले आणि एवढ्यावरचं त्या थांबल्या नाहीत तर हे सर्व नुसतं बोलायचं नाही तर कायद्याच्या रूपात नेहमीसाठी राहावे त्त्यांची सुरक्षितता व्हावी यासाठी त्या आग्रही होत्या ज्या दिवशी हा दुर्दैवी प्रसंग घडला त्याच्या एक महिन्या आधीचं ताईने शासनाला विधवा, घटस्फोटीत, परीतक्त्या व एकल स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी काही मागण्या शासनाकडे मांडल्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाही  तर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज जेव्हा मी विचार करतो की जिथे भाऊ- भावाच्या जीवावर उठलेला आहे वडील-मुलगा, सासू- सून बहिण- भाऊ यांचे आपसात असलेले नातेसंबंध संपुष्टात येण्याच्या काठावर आहेत अशा समाजात एक स्त्री आपल्या कुठल्याही नात्या-गोत्याच्या नसलेल्या स्रीयांच्या कल्याणासाठी स्वत: चा जीव देण्याचा इशारा देतात यासाठी सिंहाचं काळीज असावं लागतं. केवळ स्त्री आणि त्यांचा उद्धार हाचं  विचार डोक्यात घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा एक स्री देते यासाठी लाख हत्तीचं बळ अंगात असावं लागतं खऱ्या अर्थाने ताई ह्या बोलके सुधारक नव्हे तर कर्त्या सुधारक होत्या. 
ताईंच्या मागणीला शासनाने गांभीर्याने घेतले नाही आणि म्हणून १८ डिसेंबर २००७ ला ताईंनी जो इशारा दिला होता त्यानुसार स्वतःच्या प्राणाचे बलिदान समस्त स्त्रियांच्या उत्थानासाठी दिले. जवळपास दीड हजार स्त्रियांना सोबत घेऊन त्यांच्यासमोर ताईंनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि २५ डिसेंबर २००७ ला सायन हॉस्पिटल मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मालवली. निगरगट्ट शासनाने ताईंच्या मागण्यांचा साधा विचारही त्या हयात असताना केला नाही. ही शासनाची उदासीनता दिसून येते. ये धरती खून मांगती है। म्हणजे प्राणाची आहुती दिल्या शिवाय शासनाला जाग येत नाही का ? इतकं कसं उलट्या काळजाचं शासन आहे.
ह्या भावना त्यावेळी अनेक स्त्रियांच्या मनात येत होत्या ही दुर्दैवी घटना भारताच्या इतिहासातला काळा दिवस होता महिलांच्या हक्कासाठी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला किती वेदना  झाल्या असतील त्या माऊलीला याची कल्पना आपण न केलेलीच बरी साधा चटका जरी लागला तरी आपण किती विव्हळतो संपूर्ण शरीर जेव्हा आगीत जळत होते त्या माऊलीच्या वेदने बद्दल आपण काय बोलावे शब्द फुटत नाहीत. ताईच्या निधनानंतर शासनाला जाग आली आणि त्यांनी एक परिपत्रक काढले की, ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी ॲम्बुलन्स ब्लँकेट आग विझवणाऱ्या सर्व वस्तू असाव्यात म्हणजेच एखादा जीव जाईपर्यंत  घटनेचे गांभीर्य शासनाला नसते असे यावरून प्रकर्षाने जाणवते.
संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले आणि या घटनेमुळे ताईंनी मांडलेला प्रश्न ऐरणीवर आला सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी या घटनेची ताबडतोब दखल घेऊन अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. तत्कालीन मुख्यमंत्री मा.स्व.विलासराव देशमुख यांनी ताईच्या या बलिदानाची दखल घेऊन स्त्रियांच्या कल्याणासाठी लढणाऱ्या ताईला ‘वीर स्त्री’ ही पदवी दिली. देशात हुंडाबळी आपसातील वाद, आजारपण यामुळे जाळुन घेणे या अनेक गोष्टी समाजात आपण पाहतो.परंतु स्त्रियांच्या उत्थानासाठी स्वतःला जाळून घेणारी हि स्त्री भारतातीलचं नव्हे तर जगातील एकमेव उदाहरण असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या घटनेसाठी जबाबदार असलेले तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तडकाफडकी सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने एक समिती गठन केली आणि ताईंनी मांडलेल्या मागण्या कशा पूर्ण करता येतील याच्या संदर्भात काम सुरू केले. आज २०२४ मध्ये जवळपास ९०% मागण्या शासनाने मान्य केल्या आणि त्याबद्दलचे आदेश पारित केले ही ताईंना शासनाने दिलेली खरी आदरांजली ठरली. त्यांनी शासनाकडे ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्वच आपणांसमोर न मांडता महत्त्वाच्या ठळक मागण्या आपणासमोर मांडतो की ज्यांच्यामुळे संपूर्ण स्त्रियांच्या जीवनात आशेचा किरण प्रस्थापित झाला. ताईंच्या या बलिदानामुळे राशन कार्ड ची मागणी अंत्योदयचे कार्ड एक स्पेशल ड्राईव्ह काढून एका महिन्यातचं सर्व विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या स्त्रियांना दिले. 
    २००८ मध्ये ज्यांना वडील नाही आई-वडील नाहीत त्यांना ६०० रु. महिना तात्काळ सुरू केला होता. जो सध्याच्या विद्यमान शासनाने ३००० रुपये केला आहे. आणि सर्व महाराष्ट्रात गाजत असलेली लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट सर्व विधवा घटस्फोटीत परितक्त्या व एकल स्त्रिया जिने लग्न केले नाहीत यांचा समावेश केला हे विशेष…
   यानंतरची सर्वात महत्त्वाची मागणी मुलाच्या नावासमोर फक्त वडिलांचेचं नाव होते परंतु ताईंनी केलेल्या मागणीमुळे आज प्रत्येक कागद पत्रावर आईचे नाव कंपल्सरी केले. या प्रकारचा कायदा १ मे २०२४ रोजी करून तो महाराष्ट्रात लागू करण्यात आला. आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख यांनी तर आधी पासूनच स्वतःच्या नावासमोर आईचे नाव लावण्याचा प्रघात सुरू केला होता हे विशेष संजय कमल अशोक या नावाने ते संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहेत. त्यावेळी आदरणीय वर्षा गायकवाड ह्या मंत्री होत्या आज जेव्हा त्या खासदार झाल्या तेव्हा मोठ्या सन्मानाने त्यांनी आईच्या नावासह खासदारकीची शपथ घेतली आणि ते आता सर्व रूढ झाले आहे किती मोठे परिवर्तन या निर्णयामुळे झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
   त्याचप्रमाणे जनगणना जी देशासाठी अत्यंत महत्वाची व आवश्यक समजली जाते २०११ च्या जनगणनेमध्ये विधवांसाठी स्वतंत्र रकानाचं शासनाने दिला आहे. जेणेकरून वास्तविक माहिती शासनाकडे जाईल व त्या माध्यमातून विकासाच्या धोरणात्मक योजना आखण्यास सहाय्य होईल यासाठी केंद्रीय बाल विकास मंत्री रेणुका चौधरी यांनी निती आयोगाशी चर्चा करून संघटनेच्या मागणीला बळ दिले आणि यश मिळाले. स्वामिनी विधवा विकास मंडळ देशातील पहिली संघटना असेल जी कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान घेत नाही.ही संघटना नॉन फंडिंग आहे. कुणाकडून एकही पैसा घेत नाही हे विशेष तरीदेखील देशातील पहिला सर्व धार्मिक विधवा पुनर्विवाह सोहळा संघटनेने आयोजित केला होता जेणेकरून अशा स्त्रियांना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त होईल हाचं उदात्त हेतू संघटनेचा आहे.
 २७ फेब्रुवारी २०१० ला शासनाने अक्षर प्रकाशन मुंबईच्या सहकार्याने ‘पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची’ हा ग्रंथ संपादित केला त्यामध्ये महाराष्ट्र भरातून सामाजिक कामाच्या प्रेरणांचा बोध आणि आव्हानांचा शोध घेतला गेला. मेघा कुलकर्णी यांनी या ग्रंथाचे संपादन केले. या पुस्तकांमध्ये ‘आजच्या सावित्री’ म्हणून एक संपूर्ण प्रकरणचं ताईंनी केलेल्या स्वामिनी विधवा विकास मंडळ यांच्या कार्यावर आहे.  हा ग्रंथ सर्व आमदारांना शासनाने कंपल्सरी केला आहे हे विशेष….
   महाराष्ट्र राज्य सर्व परीने विकसित होत असतांना फुले शाहू आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र मोठ्या दिमाखाने उभा असतांना आजही महिला महाराष्ट्रात सुरक्षित का नाहीत? हा मुद्दा देखील स्वामिनी विधवा मंडळांनी उचलला होता. त्यानंतर चं अनेक उपाय योजना कायदे महाराष्ट्रात तयार होत आहेत हे विशेषपरंतु समाजाची मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा संपूर्ण समाज बदलेल याला सुरुवात झाली हे देखील महत्त्वाचे आहे. स्वामिनी विधवा मंडळानी एक महत्त्वपूर्ण मुद्दा देखील उचलला आहे तो म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात अद्याप पर्यंत महिला मुख्यमंत्री का नाही? हा सर्वांना अंतर्मुख करणारा मुद्दा आहे. आणि तेवढाच महत्त्वाचा देखील खऱ्या अर्थाने १००% यशस्विता या मुद्द्यावरचं अवलंबून आहे. असं माझं वैयक्तिक मत आहे. या संस्थेद्वारे दरवर्षी मोठ्या प्रमाणात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विविध आंदोलने, पथनाट्य आयोजित करण्यात येतात संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद लाभतो हेचं स्वामिनीचे यश आहे. मी स्वामिनीशी जुळलो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.
विधवा,परित्यक्ता व घटस्फोटिता महिलांच्या वाट्याला आलेले जिणं खूपच वाईट असतं. त्यांची आर्थिक स्थिती बिकट असेल तर मग संसाराचा गाडा ओढताना त्यांची खूपच कसरत होते. जीवन नकोसे होते. विधवांच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणी तरी आधार दिला की त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो. हा आशेचा किरण लताताई देशमुख यांच्या रुपात महाराष्ट्राला मिळाला होता.
   विधवा आणि परित्यक्ता महिलांच्या प्रश्‍नांकडे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्या सक्षमीकरणात अनेक अडचणी आणि अडथळे येत असतात. त्यामुळेच सरकारने महिलांच्या या गटांचे सर्व स्तरांवरचे प्रश्‍न सोडवणे आणि त्यांना जगण्यासाठी बळ देत त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी धोरण आखावे यासाठी ताई आग्रही होत्या.
   स्त्रीच्या स्वत:च्या कार्य शक्तीला, बुद्धीला, आणि कर्तुत्वाला पूर्ण वाव मिळावा समाजात स्त्रीला समान सामाजिक दर्जा मिळावा म्हणून स्वामीनी विधवा विकास मंडळ ही स्त्री-मुक्ती चळवळ निर्माण झाली. या द्वारे स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. स्त्रियांना त्यांच्या हिताच्या कायद्यांचे ज्ञान व मदत दिली जात आहे. घटस्पोटीत, परित्यक्ता, विधवा आणि निराधार स्त्रियांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून रोजगार मिळवून दिला जात आहे. ही मदत समाजातील सर्व स्तरातील सर्व धर्माच्या स्त्रियांसाठी खुली आहे.
स्त्री ही समाजाचा पाया आहे. पायदळी तुडवली जाणारी वस्तू नाही. झाशीची राणीही एक स्त्रीचं ना, परंतु, तिने गाजवलेले शौर्य पुरुषांपेक्षा कमी नाही. इतिहासातील तिचे कार्य स्त्री जातीसाठी नवीन दिशा व प्रेरणा आहे. अशाप्रकारचे कार्य विरस्त्री लताताई देशमुख यांनी देखील केले आहे…त्यांच्या या महान कार्याला सलाम…आणि विनम्र आदरांजली…
प्रा.राहुल इंदु गोवर्धन माहुरे 
शांतीनगर,जुनेशहर,अकोला 
९८२२२७८९२५