गोंदिया,दि.३०ः-आज मोबाईल मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र, याच मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. ‘मोबाईल ही गरज आहे, पण व्यसन होऊ नये’ या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी शहरातील रिंग रोड आदर्श कॉलनीतील प्राची प्रमोद गुडधे यांनी मोबाईल स्क्रिनिंग सामाजिक धोका या देखाव्यातून अनोखी जनजागृती केली.
आज शाळकरी मुलं अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये रमली आहेत. सततच्या स्क्रिनिंगमुळे डोळ्यांचे आजार, मेंदूवर ताण, चिडचिड, सामाजिक एकटेपणा अशी समस्या उद्भवू लागली आहे. तरुणाईत नैराश्य, चिंता, झोप न समोर आले आहे. प्रौढांमध्येही संवादाऐवजी फक्त मोबाईलचे व्यसन वाढत असल्याने कुटुंबातील नाती तुटण्याच्या मार्गावर आहेत. गुडधे यांनी गणपतीच्या मंडपात लावलेल्या देखाव्यातून मोबाईल स्क्रिनिंगचे दुष्परिणाम प्रभावीपणे दाखवले आहे. मोबाईलमध्ये बुडालेली मुलं, पालकांपासून दुरावलेला संवाद, घरातील शांत वातावरण, मानसिक तणावाने ग्रस्त लागणे आदी लक्षणे वाढत असल्याचे समाज या सर्व बाबींचे सजीव चित्रण करण्यात आले आहे.
पाहणाऱ्यांना हे दृश्य धक्का देणारे, विचार करायला लावणारे आणि अंतर्मुख करणारे आहे. या देखाव्यांमुळे अनेकांनी त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या बदलांची जाणीव व्यक्त केली. या देखाव्याच्या माध्यमाने आपण आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळ तर करीत नाही.ना? असा प्रश्न भाविकांच्या मनात उमटत आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर थांबवून, संवाद पुन्हा सुरू करण्याची वेळ आल्याची जाणीव हे देखावे पाहिल्यानंतर प्रत्येक पालकाच्या मनात झाल्याचे दिसून येते. मोबाईल न वापरण्याचा संदेश नाही, पण मर्यादित वापर, आत्मसंयम आणि परिवाराशी संवादावर भर देणारा हा देखावा समाजासाठी आरसा ठरला आहे. गणरायाच्या साक्षीने दिलेला हा संदेश लोकांच्या मनालाही भावला आहे. मोबाईल काळाची गरज असला तरी संयमाने वापरला पाहिजे. संवाद हरवला तर नाती तुटतात आणि नाती तुटली तर समाज विखूरला जातो. हाच संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गणेशोत्सव फक्त उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे पर्व नाही तर समाज जागृतीचे व्यासपीठ आहे. त्याचा योग्य उपयोग करीत नागरिकांना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम दाखवून एक अर्थपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे प्राची गुडधे यांनी सांगितले.





