
मुंबई,दि. १९– महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. यामध्ये 1 जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये 2 कोटी 81 लाख 38 हजार 634 रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे ट्विटरवरून आज जाहीर केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव, शासकीय अधिकारी व राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.