ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

0
14

मुंबई, दि.२7  : सन 2016 या वर्षासाठी चा गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर पुरस्कार  ज्येष्ठ संगीतकार,संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक  उत्तम सिंग यांना प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज जाहीर केला आहे. रु. 5 लाख रोख तसेच मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने श्री.उत्तम सिंग यांच्या नावास अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह,श्रीधर फडके, श्रीमती आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रीमती श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.उत्तम सिंग यांचा जन्म 25 मे 1948 साली झाला. उत्तम सिंग यांचे वडील सतार वादक होते. उत्तम सिंग यांनी त्यांच्या वडीलांकडून वयाच्या 4थ्या-5व्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली. त्यांनी सात वर्षे  मटका वाद्य, 6 महिने सितार वाद्य  व  दोन वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.

श्री. उत्तम सिंग 12 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील त्यांना मुंबईत घेऊन आले.  वयाच्या 12 वर्षापासून  त्यांनी तबला व व्हायोलिन याचे शिक्षण घेतले. उत्तम सिंग यांनी तीन वर्षे व्हायोनिलन वादनाचे काम केले. सन 1963 रोजी त्यांना मोठा बेक्र मिळाला. उत्तम सिंग यांनी नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र. तसेच राहुल देव बर्मन यांच्या सारख्या ज्येष्ठ संगीतकारांसोबत कामे केली. त्यांची ही कारकीर्द चालू असताना त्यांना संगीतकार जगदीश खन्ना  यांची साथ लाभली. या जोडगोळीने अनेक भाषांमध्ये कामे केली. अनेक हिंदी व तामिळ चित्रपंटासाठी कामे केली. राजश्री प्रॉडक्शनचे गाजलेले चित्रपट ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ तसेच विविध तामिळ चित्रपटांसाठी आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले. त्यांनी मनोज कुमार यांचे पेंटरबाबू व क्लार्क या चित्रपटांनाही संगीत दिले. 1992 साली जगदीश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. एक संगीतकार म्हणून चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्मन, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या  चित्रपटांना संगीत दिले. 1996 साली उत्तम सिंग यांनी ‘ओम साई ओम’ व 2002 साली सुर या खाजगी अल्बमला संगीत दिले. तसेच 1997 साली त्यांना ‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला व 2002 साली ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृप्ट संगीत दिग्दर्शक) जाहीर झाला.