राज्यपालांच्या हस्ते ‘आय फॉर आफ्रिका’ व्यापार परिषदेचे उद्घाटन

0
13

 आफ्रिकी विद्यापीठांना शैक्षणिक सहकार्य करण्याचे आश्वासन

            मुंबई, दि. 27 : भारत आणि आफ्रिकन देशामधील संबंध पूर्वापार चालत आले असून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आणि न्यायासाठीचा लढा  आफ्रिकेतून सुरू केल्यामुळे भारताला आफ्रिकेबद्दल तसेच तेथील लोकांबद्दल विशेष आस्था आहे. भारत आणि आफ्रिकेला मोठ्या प्रमाणात युवा लोकसंख्या लाभली असून आज कृषी, मानव संसाधन विकास, पर्यटन आदि क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर उभयपक्षी व्यापार वाढल्यास त्याचा फायदा भारत आणि आफ्रिकेतील नागरिकांना होईल, असे प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
            इंडो आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या ‘आय फॉर आफ्रिका’ या चार दिवसांच्या व्यापार विषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
            महाराष्ट्र देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य असून परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शैक्षणिक दृष्ट्या देखील प्रगत असून आफ्रिकेतील अनेक देशातील विद्यार्थी राज्यात उच्च शिक्षण घेत आहेत. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र तसेच आफ्रिकेतील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
             कार्यक्रमाला दक्षिण आफ्रिकेच्या लघू उद्योग मंत्री एलिझाबेथ थाबेत, आफ्रिकन राजदूतांचे भारतातील डीन तसेच एरिट्रीयाचे राजदूत अलेम वोल्देमरियम, इंडो आफ्रिकन चेंबरचे अध्यक्ष के एल डागा, महासचिव सुनंदा राजेंद्रन, अनेक आफ्रिकी देशांचे राजदूत, वाणिज्यदूत व व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते. आय फॉर आफ्रिका परिषद व प्रदर्शन दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत खुले आहे.