गोरेगाव: आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळेवर बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपर, तर दुसरीकडे मनाला चटका लावणाऱ्या प्रसंगातही मुलीने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १७ वर्षीय मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द प्रेरणादायी ठरली आहे. गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील शालिनी छन्नुलाल पोंगळे असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
२३ फेब्रुवारीला सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास शालिनीची आई बबिता पोंगळे हिचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी पी.डी. रंहागडाले विद्यालय गाठून शालिनीला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली, तर प्राचार्य सी. डी. मोरघडे यांनी शाळेकडून शालिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करीत शालिनीला धीर दिला.
शालिनी पोंगळे ही गोरेगाव शहरातील पी. डी. रहांगडाले विद्यालयातील बारावीची कला शाखेची विद्यार्थिनी, मंगळवारी (दि. २४) शालिनीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. पण पेपरच्या आदल्या दिवशीच सोमवारी (दि. २३) रात्री ८ वाजता शालिनीची आई बविता पोंगळे यांचा गोंदियातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे शालिनीसह पोंगळे कुटुंबावर शोककळा पसरली.आईचा ३८ व्या वर्षी मृत्यूने शालिनीवर मोठे संकट कोसळले. या सर्व दुःखद घटनेची माहिती शालिनीने पी.डी. रहांगडाले विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरघडे व वर्गशिक्षक डी. एम. राठोड यांना दूरध्वनीवरून दिली.
आईचे अंत्यसंस्कार करायचे आहे, मी आज पेपर देऊ शकत नाही. शालिनीचे हे शब्द ऐकताच प्राचार्य सी.डी. मोरघडे यांनी आपल्या शिक्षकासह शालिनीचे घर गाठले. तिची समजूत काढली व शालिनीला पेपर देण्यासाठी स्वतः परीक्षा केंद्रावर घेऊन आले. दीड तासाच्या आत पेपर सोडवून झाल्यावर शालिनीला पुन्हा शिक्षकांनी तिच्या घरी सोडून दिले.





