मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट

0
13

गोंदिया,दि.21-तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर क्षेत्राचा कायापालट करण्याचा वसा अदानी पॉवर प्लाँटच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. अदानी फाऊंडेशनच्या सहकार्याने मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट केल्याने जिल्ह्यातून तिसर्‍या क्रमांकाचा आनंदीबाई जोशी पुरस्काराचा मानकरी सदर केंद्र ठरला.
मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कायापालट योजनेला अदानी पॉवर व अदानी फाऊंडेशनच्या सहकार्याने केंद्राचे कायापालट करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी आ. राजेंद्र जैन व माजी आ. दिलीप बन्सोड यांच्याशी संपर्क साधून अदानीचे स्टेशन प्रमुख चैतन्यप्रसाद शाहू यांची भेट घेवून चर्चा घडवून आणली. या वेळी शाहू यांनी मुंडीकोटा आरोग्य केंद्राला कायापालट योजनेसाठी सहकार्य करण्याची भूमिका दर्शविली होती.
जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने स्टेशन प्रमुख शाहू यांनी त्वरित कामाला मंजुरी दिली. आरोग्य केंद्रातील स्वच्छता, शौचालयाचे नियोजन, औषधी ठेवण्याचे कपाट, समोर-आत प्रकाश व्यवस्था, पंखे, वॉटर फिल्टर, थंड पाण्यासाठी यंत्राची सोय असे अनेक साहित्य उपलब्ध करून देण्याचे सी.पी. शाहू यांनी ठरविले. तिरोडा तालुक्यातील जनतेचे अदानी पॉवरसाठी मोलाचे सहकार्य लाभले व लाभत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांना मोठे सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासनही शाहू यांनी दिले.
कायापालट योजनेंतर्गत मुंडीकोटा येथे अदानी पॉवरचे चैतन्यप्रसाद शाहू, संजय, दिनेश गुप्ता, फाऊंडेशनचे नितीन शिवाडकर, विमल पटेल, धनंजय भुतीया, राजकुमार मोरे यांनी सतत भेटी दिल्या व काळजीने कामे करवून घेतली. कायापालट योजनेतून आरोग्य केंद्राचा विकास करण्यात सहकार्य केल्याबद्दल जि.प. सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सभापती उषा किंदरले, सदस्य मनोहर राऊत, सरपंच निर्मला भांडारकर, माजी जि.प. सदस्य विठ्ठल पारधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्वता मेश्राम व डॉ.आय.के. शेख यांनी अदानी व्यवस्थापनाचे आभार मानले.

मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राची सातत्याने उपेक्षा केली जात होती. जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी या समस्या सोडविण्यासाठी अदानी पॉवरचे शाहू यांची भेट घेवून सहकार्याची मागणी केली होती. कायापालट योजनेला त्यांनी सहयोग देण्याचे मान्य केले. सी.पी. शाहू व पांडे यांनी सदर केंद्राचे कायापालट करण्याचे कार्य त्वरित सुरू केले. आधी स्वच्छता करण्यात आली. शौचालय व बाथरूमचे कार्य करण्यात आले. औषध ठेवण्यासाठी आलमारी देण्यात आली. प्रकाश व्यवस्थेसह पंख्यांची सोय करण्यात आली. शाहू यांनी पाणी शुद्धीकरण यंत्र, थंड पाण्याचे फ्रीजर व इतर आवश्यक साहित्य देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.