33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News गोंदिया जिल्ह्यातील महिलांची झेप

गोंदिया जिल्ह्यातील महिलांची झेप

0
59

blank

जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख

 स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती असून तिच्यामध्ये आई, बहीण, मैत्रीण, मावशी, मामी, आजी असे नाते गुंफलेले आहेत. या सर्व नात्यांना प्राधान्य देत असताना ती एक व्यक्ती आहे, हे ती  कधी कधी विसरून जाते. मात्र, तिच्या एक व्यक्ती असण्याच्या जाणिवेने एक शिवबा घडतो, क्रांतीज्योती माता सावित्री घडते, भिमाची रमाई घडते, देशाच्या प्रथम महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी,  पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू, मुख्यमंत्री मायावती, जय ललिता, ममता बॅनर्जी, पोलीस अधिकारी किरण बेदी अशा असंख्य महिला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चमकता सितारा ठरतात आणि असंख्य महिलांना प्रेरित करतात.

            ही जाणीव प्रत्येका स्त्रीत व्हावी, महिलांची स्थिती सुधारावी यासाठी 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये जागतिक महिला परिषद भरविण्यात आली होती.  जगातील देशांमध्ये महिलांची स्थिती कशी आहे, याचा अभ्यास याठिकाणी मांडण्यात आला आणि त्यानुसार नवीन वाटचाल जागतिक मंचावरून सुरू झाली. भारतातही अभ्यास झाला आणि त्या काळात लग्नानंतर हुंड्यासाठी महिलांना जळून टाकण्याचे प्रमाण अधिक दिसून आले. सोबतच महिलांची स्थिती हवी तितकीशी सुधारलेली नव्हती, असे नोंदविण्यात आले.

भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानता 26 जानेवारी 19 50 पासून दिलेली आहे.  मात्र, शिक्षणाचे प्रमाण आणि सामाजिक जागरुकतेचा अभाव असल्यामुळे तसेच पुरुष प्रधान संस्कृती या देशात रुजलेली असल्यामुळे महिलांना घराबाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागला.

महाराष्ट्र ही संतांची,  सुधारकांची भूमी पुरोगामी राज्य म्हणून देश पातळीवर गणल्या जाते. त्यामुळेच या भूमीत सर्वात  आधी बदल घडलेला दिसून येतो. 1975 नंतर झालेल्या जागतिक महिला परिषदेमध्ये ठरलेल्या बाबींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या काळातील महिला नेतृत्वाने स्वीकारली आणि आज हा बदल मोठ्या प्रमाणात राज्यात दिसून येतो. तरी राज्यातील काही भागात हा बदल लवकर स्वीकारला असल्याचे जाणवते त्यात विदर्भ ही आहे.

महिलांचे स्वयंरोजगाराचे तसेच कुठल्यातरी आस्थापनेवर काम करण्याचे प्रमाण राज्याच्या इतर भागापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राच्या पूर्व टोकाचा सर्वात शेवटचा जिल्हा गोंदिया. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड राज्य आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे. गोंदिया जिल्हा हा गोंड राजांचा आणि राणीचा जिल्हा आहे. इथे राजाचा हुकूम ज्याप्रमाणे ऐकला जात असे, त्याचप्रमाणे राणीच्या  आदेशालाही मान्यता होती. गोंदिया जिल्हा भाताचा जिल्हा असल्याने भात शेती करण्यापासून ते शासकीय अधिकारी पदावर कार्यरत महिलाअधिकारी कर्मचारी यासह खाजगी आस्थापनेमध्ये महिला सहजरित्या काम करताना दिसतात.

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून काही ना काही कामानिमित्त इथल्या स्थानिक लोकांशी संपर्क आला आणि तिथल्या खाजगी आस्थापनांवर महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक दिसून आली.

मूळतः महिला कुठलेही काम करण्याची लाज बाळगत नाही.  आपले काम सचोटीने पार पाडतात. कुटुंबासह कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी हा उद्देश ठेवून ते घरा बाहेर पाऊल ठेवतात आणि घराबाहेर काम करीत असतानाही तेवढीच सचोटी बाळगतात.

रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या अनेक हॉटेलमध्ये महिला काम करताना सहज दिसून येतात. स्वच्छता ठेवणे हा महिलांच्या स्वभावातील अभिन्न गुण असल्यामुळे जिथे महिला वर्ग काम करते तेथे स्वच्छता असतेच.

कपड्यांच्या दुकानात, भांड्यांच्या दुकानात, भाजी मंडी मध्ये,  जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी महिला कामगार प्रकर्षाने दिसतात. काही खाजगी आस्थापनाने या महिला कामगारांचे विमाही उतरविलेला आहे. ही आणखी एक सकारात्मक बाजू या जिल्ह्यात दिसून येते. यामध्ये दुर्गा भैय्या पोहेवाले यांनी सांगितले,  त्यांच्या आस्थापनेतील सर्व महिलांचे त्यांनी विमा उतरविलेला आहे. एखाद्या खाजगी आस्थापनेने याप्रमाणे निर्णय घेणे हे त्या कुटुंबाला स्थिरता देण्या सारखे आहे.

या महिलांमध्ये काही प्रमाणात प्रोफेशनलीजम कमी आहे, असे म्हणता येईल परंतु त्यांची जिद्द काम करण्याची वृत्ती ही शंभर टक्के खरी आणि इमानदारीची आहे हे नाकारता येणार नाही.

त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे असे वाटत असल्यास खाजगी आस्थापनेने त्यांना वेळेनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन अधिक प्रशिक्षित करून  महिलांची गुणवत्ता वाढवावी त्याचा परिणाम निश्चितच खाजगी आस्थापनाच्या व्यवसायिकांना पण होणारच.

महिला दिनाच्या निमित्ताने  गोंदिया जिल्ह्यातील महिलांची सुस्थिती अधिक चांगली व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी, खाजगी आस्थापनेने,  थोडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या गुणांना वाव दिल्यास नक्कीच या जिल्ह्यातील महिला या सक्षम, स्वावलंबी आणि सुस्थितीत राहतील. यासह स्वतः महिलांनी स्वतःचे स्व विश्लेषण केले, तरी त्या स्वतःचे कर्तुत्व अधिक प्रखरतेने सिद्ध करु शकतील.

गोंदिया जिल्ह्यात नुकताच मिनी पलाश सरस झाले.  या अंतर्गत इथल्या महिलांनी तब्बल 82 लाख रुपयांची कमाई केली.  ते ही स्वतः तयार केलेल्या वस्तूंपासून. शासन सर्वतोपरीने महिलांच्या पाठीशी असून महिलांनी किती झेप घ्यावी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. जिल्ह्यातील सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

अंजु कांबळे निमसरकर,जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

blank